रविवार, ८ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

तयार फराळाला पसंती; पर्यावरणपूरक भेटवस्तूंना वाढती मागणी

दिवाळीत तयार फराळाची मागणी वाढली असून चकली, करंजी, अनारसे आणि लाडूंचे दर वेगवेगळे आहेत. भेटवस्तूंमध्ये पर्यावरणपूरक आणि आरोग्यदायी पर्यायांना पसंती मिळत आहे.

तयार फराळाला पसंती; पर्यावरणपूरक भेटवस्तूंना वाढती मागणी

दिवाळीत घराघरात चकली, करंजी, अनारसे, शंकरपाळे, लाडू आणि चिवड्याचा दरवळ ठरलेला असतो. मात्र, बदलत्या जीवनशैलीत नोकरी आणि घराची जबाबदारी सांभाळणाऱ्यांना कामानिमित्त फराळ तयार करणे शक्य होत नाही. त्यामुळे सध्या तयार फराळाची चलती आहे. बाजारात पारंपरिक फराळाबरोबरच गोड आणि तिखट पदार्थांचेही अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत.

भाजणीची चकली, करंजी, अनारसे, साटोरी, चिरोटी, गोड-खारे शंकरपाळे, जिरापुरी, बाकरवडी, चिवडा, लाडू अशा पदार्थांना ग्राहकांची पसंती मिळत आहे. विशेष म्हणजे, साजूक तुपातील पदार्थांनाही मागणी असून, चवीबरोबरच दर्जाला महत्त्व दिले जात आहे.

फराळाचे दर

शेव-भाजणी चकली, करंजी आणि अनारसे प्रत्येकी ५४० रुपये किलो दराने उपलब्ध आहेत. साजूक तुपातील अनारसे एक हजार रुपये किलो, तर साजूक तुपातील बेसन लाडू ६०० रुपये किलो आहेत. गोड आणि खारे शंकरपाळे प्रत्येकी ३२० रुपये, पातळ पोहे चिवडा ३६० रुपये, भाजके पोहे चिवडा आणि मका चिवडा प्रत्येकी ३२० रुपये किलो दराने मिळत आहेत. गोड पदार्थांमध्ये बुंदी आणि बेसन लाडू प्रत्येकी ४०० रुपये, रवा लाडू ३०० रुपये, तर डिंक आणि मेथी लाडू एक हजार रुपये किलो आहेत.

भेटवस्तूंचा नवा ट्रेंड

दिवाळीत पूर्वी मिठाईचे बॉक्स, सुकामेवा आणि आकर्षक डबे यांपुरती मर्यादित असलेली भेटवस्तूंची परंपरा आता बदलत आहे. यंदा नाशिककरांकडून पारंपरिक भेटवस्तूंसोबतच आकर्षक पॅकेजिंग, वैयक्तिक नाव असलेल्या वस्तू, पर्यावरणपूरक भेटवस्तू आणि अनुभवाधारित गिफ्ट्सना पसंती मिळत आहे. भेटवस्तूची किंमत किती, यापेक्षा ती किती वेगळी आणि समोरच्या व्यक्तीच्या आवडीची आहे, याकडे अधिक लक्ष दिले जात आहे. नाव कोरलेले मग, फोटोफ्रेम, आकर्षक दिवे, सुगंधी मेणबत्त्या, शोभेच्या वस्तू, हस्तनिर्मित कलाकुसरीच्या वस्तू, बांबू किंवा मातीपासून तयार केलेल्या वस्तूंचा समावेश आहे. विशेषतः तरुणाईमध्ये स्वतःसाठीही आवडीची भेटवस्तू खरेदी करण्याचा सेल्फ गिफ्टिंगचा ट्रेंड वाढताना दिसत आहे.

आरोग्यदायी भेटवस्तूंनाही पसंती मिळत आहे. साखरविरहित मिठाई, विविध प्रकारचे फ्लेवर्ड ड्रायफ्रूट्स, खजूर, बदाम, अक्रोड, काजू यांचे आकर्षक कॉम्बिनेशन असलेल्या हॅम्पर्सना मागणी आहे. चॉकलेट्स, कुकीज, कॉफी, चहा आणि स्थानिक खाद्यपदार्थ यांची एकत्रित मांडणी असलेले गिफ्ट बॉक्सही आकर्षण ठरत आहेत. पारंपरिक फराळाला आधुनिक पॅकेजिंगची जोड दिली जात आहे.

स्रोत: मूळ बातमी

विशाल राजपूत

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance