खानदेशात रब्बी हंगामाची पेरणी रखडत सुरू आहे. आतापर्यंत सुमारे २५ ते २७ टक्के पेरणी पूर्ण झाली असून हरभऱ्याची सर्वाधिक सुमारे ५५ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. खानदेशात यंदा सुमारे पावणेतीन लाख हेक्टरवर पेरणी अपेक्षित आहे. यातील कोरडवाहू दादर ज्वारी आणि कोरडवाहू हरभऱ्याची पेरणी सुरू आहे. ही पेरणी या पंधरवड्यात वेगात सुरू झाली असून महिन्याच्या अखेरपर्यंत कोरडवाहू पिकांची पेरणी सुरू राहणार आहे.
कोरडवाहू ज्वारीची पेरणी कुठे?
कोरडवाहू दादर ज्वारीची पेरणी तापी, अनेर आणि गिरणा नदीच्या परिसरात सुरू आहे. ही पेरणी जळगाव, चोपडा, अमळनेर, धुळ्यातील शिरपूर आणि नंदुरबारमधील शहादा भागात होत आहे. कोरडवाहू भागात पेरणीला अजूनही वेळ असल्याने शेतकरी टप्प्याटप्प्याने पेरणी करत आहेत.
पेरणीला विलंब का झाला?
यंदा पेरणी सुरुवातीपासूनच रखडत सुरू आहे. सोयाबीन पिकाची मळणी केल्यानंतर त्यात हरभऱ्याची पेरणी करण्याचे नियोजन अनेक शेतकऱ्यांनी केले होते. सोयाबीनची कापणी, मळणी आणि त्यानंतर शेताची पूर्वमशागत यासाठी वेळ लागला. त्यात सणासुदीचे दिवस असल्याने पेरणीला विलंब झाला. सध्या गहू पेरणी अपवादानेच सुरू आहे. हरभऱ्याची पेरणी कृत्रिम जलसाठा असलेले शेतकरी करत आहेत.
पूर्वहंगामी कापूस पीक काढून त्यात पुढे हरभरा आणि मक्याची पेरणी केली जाणार आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी कापूस पीक काढण्याचे काम सुरू आहे. अनेकांचे कापूस पीक आणखी एक वेचणीनंतर काढले जाणार आहे. त्यामुळे या भागात पेरणीला विलंब होणार असून काही ठिकाणी पेरणी डिसेंबरमध्येही होण्याची शक्यता आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply