शनिवार, ७ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

स्वीकृत नगरसेवक वादावर पडदा; दहाही अर्ज वैध ठरले

नाशिक महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक नियुक्तीच्या वादावर पडदा पडला. छाननी समितीने भाजपचे सहा, उबाठा व शिवसेनेचे प्रत्येकी दोन असे सर्व दहा अर्ज वैध ठरवले.

स्वीकृत नगरसेवक वादावर पडदा; दहाही अर्ज वैध ठरले

नाशिक महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक नियुक्तीवरून सुरू असलेल्या वादावर पडदा पडला आहे. छाननी समितीने विभागीय आयुक्तांकडे झालेल्या गटनेत्यांच्या नोंदणीचा आधार घेतल्याने काँग्रेसकडून भाजपच्या स्वीकृत सदस्य नियुक्तीसाठी दिलेला कागदोपत्री पाठिंबा मोडीत निघाला आहे. भाजपचे सहा, शिवसेना (उबाठा) आणि शिवसेनेचे प्रत्येकी दोन असे सर्व दहा अर्ज वैध ठरले असून महासभेत स्वीकृत सदस्यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली जाणार आहे.

न्यायालयाच्या सूचनेनंतर प्रक्रिया पूर्ण

स्वीकृत सदस्य नियुक्तीसाठी काँग्रेसचे नगरसेवक सुफी जीन यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने सहा आठवड्यांत प्रक्रिया पार पाडण्याच्या सूचना महापालिका प्रशासनाला दिल्यानंतर ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

विभागीय आयुक्तांकडे शिवसेना (उबाठा) आणि काँग्रेसची संयुक्त नोंदणी झाली असून त्याला शहर विकास आघाडी असे नामकरण करण्यात आले आहे. मात्र काँग्रेसला स्वीकृत नगरसेवकपद हवे होते, तर उबाठाकडून स्वतंत्रपणे हेमंतकुमार गायकवाड आणि बाबासाहेब गायकवाड यांचे नामनिर्देशनपत्र सादर करण्यात आले. त्यापूर्वी नगरसेवक सुफी यांनी मुंबईत शिवसेना (उबाठा) विरोधात मोर्चेबांधणी केली होती. भाजपने शहर विकास आघाडीत फूट पाडण्यासाठी आणि आपल्या सहा स्वीकृत सदस्यांव्यतिरिक्त आणखी एक पद पदरात पाडून घेण्यासाठी मोर्चेबांधणी केली.

स्वीकृत अर्ज दाखल करण्याच्या ४ नोव्हेंबरच्या अखेरच्या दिवशी भाजपकडून सहा जणांचे नामनिर्देशन दाखल करण्यात आले. सुफी जीन यांनी काँग्रेसकडून भाजपचे सुनील आडके यांना पाठिंबा दर्शविणारे पत्र टपालाद्वारे सादर केल्याने तांत्रिक अडचण निर्माण झाली होती. महासभेत काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

छाननी समितीचा निर्णय

महापालिका आयुक्त मनिषा खत्री यांनी नामनिर्देशन पत्रांची छाननी करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त नीलेश भदाणे, प्रशासन उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर, लेखा परीक्षक जयंत गायकवाड, लेखाधिकारी दत्तात्रेय पाथरुट, उपायुक्त नितीन नेर आणि सुवर्णा दखणे यांची समिती गठित केली होती. समितीच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत विभागीय आयुक्तांकडे नोंदणी झालेल्या गटनेत्यांच्या पत्रानुसारच नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे उबाठाचे दोन, भाजपचे सहा आणि शिवसेनेचे दोन अशा एकूण दहा सदस्यांचे अर्ज छाननीत वैध धरण्यात आले.

महासभेत वैध स्वीकृत नगरसेवकांची यादी महापौर हिमगौरी आडके यांच्याकडून घोषित केल्यानंतर अधिकृत नगरसेवक पद ग्राह्य धरले जाणार आहे.

स्वीकृत सदस्यांची अंतिम यादी

भाजप : अजित चव्हाण, हेमंत धात्रक, संदीप लेनकर, रोहिणी नायडू, रामहरी संभेराव, चंद्रशेखर पंचाक्षरी. शिवसेना (उबाठा) : हेमंतकुमार गायकवाड, बाबासाहेब गायकवाड. शिवसेना : चंद्रकांत लवटे, बाबूराव आढाव.

दरम्यान, स्वीकृत सदस्यपदासाठी नगरसचिव विभागाकडून तीन गटनेत्यांनाच दहा अर्जांचे वाटप करण्यात आले होते. तरीही त्यातील एक अर्ज सुफी जीन यांच्याकडे गेला आणि त्यांनी आडके यांच्या नावाचा प्रस्ताव सादर केला. अधिकृत अर्ज दिला नसतानाही जीन यांच्याकडे अर्ज कुठून आला, याची तपासणी प्रशासनाने करावी, अशी मागणी शिवसेना (उबाठा) गटनेते केशव पोरजे यांनी केली आहे.

स्रोत: मूळ बातमी

विशाल राजपूत

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance