नंदुरबार नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत विषयपत्रिकेवरील १६ पैकी १५ विषयांना सर्वानुमते मंजुरी मिळाली. शुक्रवारी, ६ नोव्हेंबर रोजी लोकनेते माणिकरावजी गावीत सभागृहात ही सभा झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी होत्या. या वेळी उपनगराध्यक्ष प्रथमेश चौधरी आणि मुख्याधिकारी राहुल वाघ उपस्थित होते.
सभेच्या विषयपत्रिकेत शहराच्या विकासाशी संबंधित विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. मदनमोहन इंडस्ट्रियल अभिन्यास, झुलेलाल नगर आणि माणिक नगर येथील खुल्या जागांवर उद्यान, सामाजिक सभागृह, डोम आणि हॉल विकसित करण्यासाठी जागा उपलब्ध करून देणे, ज्येष्ठ नागरिकांसाठी सामाजिक सभागृह उपलब्ध करणे, शहरातील रस्त्यांची कामे विकास आराखड्यानुसार करण्यासाठी संबंधित यंत्रणांना प्रस्ताव देणे, सेंद्रिय शेती उत्पादकांना विक्रीसाठी जागा उपलब्ध करून देणे, कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्रकल्प उभारणे तसेच नगरोत्थान महाअभियानांतर्गत विकास कामांसाठी निधीची मागणी करणे आदी महत्त्वाच्या विषयांचा समावेश होता.
शहराच्या मंजूर विकास योजनेतील आरक्षण क्रमांक १५ अर्थात स्मशानभूमीच्या आरक्षणाबाबतचा विषय क्रमांक १४ चर्चेला आला असता भाजपसह विरोधी पक्षनेते हिरालाल चौधरी यांनी त्याला विरोध केला. त्यामुळे १६ पैकी १५ विषय मंजूर झाले.
पिंजारी विहिरीवरून वाद
पिंजारी विहिरीलगत असलेल्या बंद पंपहाऊसच्या अंदाजे ५ बाय १.८० मीटर जागेच्या भाडेप्रकरणावरून यापूर्वी विरोधी पक्षनेते हिरालाल चौधरी यांनी प्रश्न उपस्थित केला होता. स्थायी समितीचा ठराव आधी करण्यात आला आणि त्यानंतर व्यावसायिक भाडेकरारासाठी निविदा जाहिरात प्रसिद्ध झाली. त्यामुळे आधी ठराव आणि नंतर जाहिरात कशासाठी, असा सवाल चौधरी यांनी उपस्थित केला. या संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता आणि नियमांचे पालन झाले आहे का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. दरम्यान, पिंजारी विहीर नगरपरिषदेने स्वतःच्या ताब्यात ठेवावी आणि ती कोणालाही भाड्याने देऊ नये, अशी मागणी त्यांनी सभेत केली. दुष्काळी परिस्थितीत या विहिरीतील पाणी शहरातील नागरिकांसाठी खुले करावे, अशी भूमिका त्यांनी मांडली. विहिरीसंदर्भात करण्यात आलेला ठराव रद्द करण्याची मागणीही त्यांनी केली.
मास्क लावून विरोधकांची उपस्थिती
शहरातील मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात धूळ उडत असल्याने नागरिकांना श्वसनाचा त्रास सहन करावा लागत आहे. या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी विरोधी पक्षाच्या सर्व नगरसेवकांनी मास्क लावून सभेला उपस्थिती लावली. शहरातील रस्त्यांची स्वच्छता, धुळीचे नियंत्रण आणि नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न प्रशासनाने गांभीर्याने घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली. या वेळी पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील, बांधकाम सभापती देवेंद्र जैन, दीपक दिघे, गटनेते आनंदा माळी, नगरसेवक पंकज चौधरी, रेखा प्रविण चौधरी, निता सतीश मराठे, सारिका लक्ष्मण माळी, शोभा सुरेश चौधरी, सुषमा धर्मेश गावित आदी उपस्थित होते.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply