भिवंडी तालुक्याच्या प्रस्तावित अपर तालुक्याचे मुख्यालय अंबाडी येथेच व्हावे, अशी ठाम भूमिका आमदार निरंजन डावखरे यांनी मांडली आहे. भौगोलिक परिस्थिती, आदिवासीबहुल लोकसंख्या, मागासलेपणा आणि प्रशासकीय सोयींचा विचार करता अंबाडीशिवाय अन्य ठिकाणी मुख्यालय निश्चित करणे अन्यायकारक ठरेल, असे त्यांनी स्पष्ट केले. या मागणीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत लवकरच बैठक घडवून आणण्याचे आश्वासनही त्यांनी अंबाडी तालुका निर्मिती कृती समितीच्या शिष्टमंडळाला दिले.
अंबाडी तालुका निर्मिती कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी ठाणे महापालिकेचे माजी उपमहापौर तथा विद्यमान गटनेते मुकेश मोकाशी आणि शिक्षक क्रांती संघटनेचे अध्यक्ष सुधीर घागस यांच्या समवेत आमदार डावखरे यांची भेट घेतली. यावेळी प्रस्तावित अपर तालुक्याचे मुख्यालय अंबाडी येथेच निश्चित करावे, अशी आग्रही मागणी करण्यात आली. समितीच्या पदाधिकाऱ्यांनी अंबाडी परिसराची भौगोलिक रचना, दुर्गम व डोंगराळ परिस्थिती, दीर्घकाळापासून रखडलेला विकास आणि आदिवासीबहुल लोकसंख्येच्या समस्यांकडे आमदारांचे लक्ष वेधले.
३७ पेसा ग्रामपंचायती अंबाडी क्षेत्रात
भिवंडी तालुक्यातील ४० आदिवासी पेसा ग्रामपंचायतींपैकी तब्बल ३७ ग्रामपंचायती प्रस्तावित अंबाडी क्षेत्रात येतात. हा परिसर प्रामुख्याने कृषिप्रधान, आदिवासीबहुल आणि डोंगराळ असून औद्योगिक विकासापासून वंचित आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना प्रशासकीय सेवा सहज उपलब्ध होण्यासाठी स्वतंत्र प्रशासकीय केंद्राची आवश्यकता असल्याचे समितीने स्पष्ट केले. अपर तालुक्याचे मुख्यालय अंबाडीऐवजी अन्यत्र झाल्यास दुर्गम भागातील नागरिकांना शासकीय कामांसाठी पुन्हा लांबचा प्रवास करावा लागेल. त्यामुळे प्रशासकीय विकेंद्रीकरणाचा मूळ उद्देशच निष्फळ ठरेल, असेही समितीने निदर्शनास आणून दिले.
याप्रसंगी ठाणे महापालिकेचे गटनेते मुकेश मोकाशी, अंबाडी तालुका निर्मिती कृती समितीचे अध्यक्ष शरद पाटील, सल्लागार मोहन पाटील, प्रभाकर पाटील, मिठाराम पाटील आणि शिक्षक क्रांती संघटनेचे अध्यक्ष सुधीर घागस उपस्थित होते. अंबाडी परिसराचा सर्वांगीण विकास, आदिवासी नागरिकांची प्रशासकीय सोय आणि नैसर्गिक न्याय या बाबींचा विचार करता अंबाडी येथेच अपर तालुक्याचे मुख्यालय व्हावे, या मागणीला आपण सकारात्मक असल्याचे आमदार डावखरे यांनी सांगितले. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शिष्टमंडळाची लवकरच बैठक घडवून आणण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचेही त्यांनी आश्वस्त केले.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply