फटाकेमुक्त आणि पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करावी, असे आवाहन महाराष्ट्र आदिवासी डॉक्टर असोसिएशन (माडा) आणि इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे नागरिकांना करण्यात आले आहे. नंदुरबार येथून हे आवाहन करण्यात आले.
दिवाळी हा आनंद, उत्साह आणि प्रकाशाचा सण आहे. मात्र दिवाळीच्या काळात फटाक्यांमुळे होणारे वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण आणि त्याचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेता यंदाची दिवाळी फटाकेमुक्त आणि पर्यावरणपूरक पद्धतीने साजरी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
लहान मुले आणि रुग्णांना सर्वाधिक धोका
फटाक्यांच्या धुरामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला, दमा आणि हृदयविकाराचे रुग्ण तसेच इतर गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांना श्वसनाचा त्रास होऊ शकतो. या सामाजिक आणि आरोग्यविषयक जनजागृती मोहिमेत नंदुरबारमधील सर्व नागरिक, युवक, सामाजिक संस्था आणि व्यापारी बांधवांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन डॉ. राजेश वळवी आणि डॉ. राजेश कोळी यांनी केले आहे.
निरोगी समाज, प्रदूषणमुक्त पर्यावरण आणि आनंदी दिवाळी, असा संकल्प करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.
नंदुरबारमध्ये फुफ्फुसाचे रुग्ण वाढले
नंदुरबार जिल्ह्यात, विशेषतः शहरांमध्ये, फुफ्फुसाच्या आजाराचे रुग्ण वाढले आहेत. दमा, टीबी आणि कॅन्सरचे रुग्ण वाढत असून लहान मुलांमध्ये ॲलर्जी आणि दम्याचे प्रमाण जास्त आहे. फटाक्यांच्या धुरामुळे रुग्णांवर गंभीर परिणाम होत असतो, असे माडाचे अध्यक्ष डॉ. राजेश वळवी यांनी सांगितले.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply