शुक्रवार, ६ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

जळगावात ४०० हून अधिक शेतकऱ्यांना वैरण बियाण्यांचे वाटप

जळगाव जिल्ह्यात चाराटंचाई रोखण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ४०० हून अधिक शेतकऱ्यांना वैरण बियाण्यांचे वाटप करण्यात आले.

जळगावात ४०० हून अधिक शेतकऱ्यांना वैरण बियाण्यांचे वाटप

जळगाव : शेतकऱ्यासाठी पशुधन हे केवळ उत्पन्नाचे साधन नसून त्याच्या कुटुंबाचा आधार आहे. शेतीचे नुकसान झाले तरी पशुधनच त्याला पुन्हा उभे राहण्याचे बळ देते. त्यामुळे दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांसह त्यांच्या पशुधनाचे संरक्षण करणे ही शासनाची जबाबदारी आहे. चाराटंचाई निर्माण होण्यापूर्वीच उत्पादन, साठवणूक आणि उपलब्धतेचे नियोजन करण्यात येत आहे. दुष्काळात शेतकरी आणि त्याच्या पशुधनाला वाऱ्यावर सोडणार नाही; शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, अशी ग्वाही पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.

४०० हून अधिक शेतकऱ्यांना बियाणे वाटप

पाळधी येथील शासकीय विश्रामगृहात पशुसंवर्धन विभागातर्फे आयोजित कार्यक्रमात पालकमंत्र्यांच्या हस्ते ४०० हून अधिक शेतकऱ्यांना वैरण बियाण्यांचे प्रतिनिधिक स्वरूपात वाटप करण्यात आले. सुरुवातीला चारा साक्षरता अभियान रथाचे उद्घाटन पालकमंत्री यांच्या हस्ते झाले. जिल्हा वार्षिक योजनेतून जिल्ह्यासाठी ७४१ क्विंटल वैरण बियाणे उपलब्ध करून देण्यात आले आहे.

जिल्ह्यातील सर्व १५ तालुक्यांमध्ये दुष्काळी उपाययोजना लागू झाल्या असून चाऱ्याच्या संभाव्य टंचाईचा सामना करण्यासाठी प्रशासनाने सज्ज राहावे. शेतकऱ्यांना अडचण निर्माण झाल्यानंतर नव्हे, तर त्यापूर्वीच उपाययोजना कराव्यात, अशा सूचना पालकमंत्री पाटील यांनी दिल्या. पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. प्रदीप झोड यांनी प्रास्ताविक केले. डॉ. संदीप पाटील यांनी सूत्रसंचालन केले. माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील यांनी आभार मानले.

एकही काडी वाया जाऊ देऊ नका

जिल्हाधिकारी रोहन घुगे म्हणाले की, आगामी ऑगस्ट २०२७ पर्यंतची संभाव्य चारा गरज लक्षात घेऊन आतापासूनच नियोजन आवश्यक आहे. शेतातील एकही काडी वाया न घालवता तिचा पशुधनासाठी उपयोग करावा. पीक अवशेष जाळण्याऐवजी त्यांचे उपयुक्त चाऱ्यात रूपांतर करावे. यासाठी गेल्या महिनाभरापासून चारा साक्षरता रथ, प्रत्यक्ष प्रात्यक्षिके आणि जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहेत.

या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर, धरणगावचे तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी, गटविकास अधिकारी सागर कोल्हे, चंद्रकांत बोडरे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रताप पाटील आदी उपस्थित होते.

स्रोत: मूळ बातमी

विशाल राजपूत

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance