रविवार, ८ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

परभणीत आरोग्य आढावा बैठक; मुख्यालयी राहून सेवा द्या

परभणीत आरोग्य विभागाची जिल्हास्तरीय आढावा बैठक झाली. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मुख्यालयी राहून नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा देण्याचे निर्देश दिले.

परभणीत आरोग्य आढावा बैठक; मुख्यालयी राहून सेवा द्या

परभणी येथे जिल्हा परिषद सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य विभागाची जिल्हास्तरीय आढावा बैठक झाली. या बैठकीत आरोग्य विभागाचे विविध राष्ट्रीय कार्यक्रम, योजना, प्रशासकीय कामकाज आणि आरोग्य सेवांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. आयुष्मान भारत व वय वंदना कार्ड नोंदणी, तसेच राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानके या विषयांवरही चर्चा झाली.

सुट्टीतही सेवा सुरू ठेवण्याचे निर्देश

दिवाळी सुट्टीच्या कालावधीत सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी उपस्थित राहून नागरिकांना नियमित व प्रभावी आरोग्यसेवा उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले. ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जनजागृती व लोकसहभाग वाढवण्यावर, तसेच गावनिहाय कृती आराखडा तयार करण्यावर भर देण्यात आला. ‘पालकमंत्री आरोग्यदूत’ अभियानांतर्गत आयुष्मान आरोग्य मंदिर पथकांमार्फत नागरिकांना त्यांच्या गावात व घराजवळ आरोग्यसेवा मिळावी, यावरही भर देण्यात आला.

माता व बालमृत्यू रोखण्यासाठी मातेच्या गर्भधारणेच्या नोंदणीपासूनच नियमित तपासणी, समुपदेशन व आवश्यक आरोग्यसेवा उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश देण्यात आले. बालकांच्या नियमित लसीकरणासाठी सर्व आरोग्य यंत्रणेने समन्वयाने काम करावे, तसेच गोवर-रुबेला सर्वेक्षण व अहवाल सादरीकरण प्रभावीपणे करावे, असेही सांगण्यात आले. आरोग्य संस्थांना राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन मिळवण्यासाठी आवश्यक निकष पूर्ण करावेत, टेलिकन्सल्टेशन, ई-सुश्रुत डॅशबोर्ड, एचएमआयएस व आयडीएसपी प्रणालीवरील माहिती नियमित अद्ययावत करून दैनंदिन अहवाल वेळेत सादर करावेत, असे निर्देश देण्यात आले.

योजनांचा लाभ आणि क्षयरोग निर्मूलन

जनआरोग्य समितीच्या बैठका नियमित घ्याव्यात, तसेच प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेंतर्गत पात्र रुग्णांना उपचारांचा लाभ मिळवून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, असे निर्देश देण्यात आले. कीटकजन्य आजारांचे सर्वेक्षण व प्रतिबंधात्मक उपाययोजना, विविध राष्ट्रीय आरोग्य अभियानांची प्रभावी अंमलबजावणी आणि जिल्हा व तालुकास्तरीय समित्यांच्या नियमित बैठका यांवरही भर देण्यात आला. क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत निक्षय मित्रांच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व ८०० क्षयरुग्णांना पोषण किट उपलब्ध करून देण्याचे नियोजन करावे, तसेच थुंकी नमुना संकलनाचे प्रमाण वाढवावे, अशा सूचना देण्यात आल्या.

कामात निष्काळजीपणा आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिला. या बैठकीस जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. किशोर सुरवसे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रावजी सोनवणे, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. शिंदे, जिल्हा क्षयरोग वैद्यकीय अधिकारी डॉ. केंद्रिकर, जिल्हा प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य डॉ. संतोष गुंजकर, सर्व वैद्यकीय अधीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, जिल्हा कार्यक्रम समन्वयक तसेच संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

स्रोत: मूळ बातमी

समृद्धी जगताप

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance