बीड जिल्ह्यातील सर्व शासकीय निवृत्तीवेतनधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची सूचना जारी करण्यात आली आहे. चालू वर्षातील हयातीचा दाखला सादर करण्यासाठी प्रशासनाने १ ते ३० नोव्हेंबर २०२६ ही मुदत निश्चित केली आहे. या मुदतीत हयातीचे प्रमाणपत्र सादर केले नाही, तर संबंधितांना डिसेंबर २०२६ पासून पेन्शन दिली जाणार नाही, असा इशारा बीडचे जिल्हा कोषागार अधिकारी महेश बाब्रस यांनी दिला आहे. त्यामुळे पेन्शनधारकांनी शेवटच्या दिवसांची वाट न पाहता लवकरात लवकर आपला दाखला सादर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
घरबसल्या ऑनलाईन दाखला देण्याची सोय
बँकांमध्ये होणारी अनावश्यक गर्दी आणि ज्येष्ठ नागरिकांना रांगेत उभे राहिल्यामुळे होणारा त्रास टाळण्यासाठी शासनाने डिजिटल माध्यमांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. jeevanpramaan.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर किंवा स्मार्टफोनवर जीवन प्रमाण ॲप्लिकेशन डाउनलोड करून घरबसल्या चेहरा किंवा बोटांच्या ठशांद्वारे ऑनलाईन ओळख पटवून हयातीचा दाखला सहज सादर करता येतो. याशिवाय डाक विभागातर्फे देखील सशुल्क डिजिटल दाखला घरपोच ऑनलाईन सादर करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
बँकेत जाऊनही दाखला देता येईल
ज्यांना ऑनलाईन दाखला देणे शक्य नाही, ते संबंधित बँकेत प्रत्यक्ष उपस्थित राहून यादीतील नावासमोर स्वाक्षरी किंवा अंगठ्याचा ठसा उमटवून दाखला देऊ शकतात. यादरम्यान आपला चालू मोबाईल क्रमांक अद्ययावत करणे, तसेच पुनर्विवाह किंवा पुनर्नियुक्तीबाबतची माहिती नोंदवणे अनिवार्य आहे. हयातीच्या प्रमाणपत्रावर बँक अधिकारी किंवा राजपत्रित अधिकाऱ्याच्या समक्ष स्वाक्षरी घेऊन ते थेट जिल्हा कोषागार कार्यालयातही जमा करता येते.
जे निवृत्तीवेतनधारक काही कारणास्तव परदेशात वास्तव्यास आहेत, त्यांच्यासाठीही विशेष सोय करण्यात आली आहे. तेथील भारतीय दूतावासाच्या माध्यमातून संबंधित पेन्शनधारक आपला हयातीचा दाखला कोषागाराकडे सुरक्षितपणे पाठवू शकतात. वेळेत दाखला न दिल्यास पेन्शन थांबवले जाईल, याची नोंद सर्वांनी घ्यावी, असे कळविण्यात आले आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply