दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासह भूजल पातळीत वाढ, वन्यप्राणी व पशुधनासाठी पाण्याची उपलब्धता आणि वनसंवर्धनाला चालना देण्याच्या उद्देशाने पश्चिम नाशिक वन प्रकल्प विभागाच्या वतीने लोकसहभागातून जलसंधारणाचा उपक्रम राबविण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत सहा कार्यकेंद्रांमधील १८ गावांत ग्रामस्थांच्या श्रमदानातून माती व वनराई बंधाऱ्यांची उभारणी करण्यात आली आहे. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा; जंगल वाचवा, वन्यजीव वाचवा’ या संकल्पनेतून राबविण्यात येणारा हा उपक्रम लोकसहभागाच्या माध्यमातून जलसंधारण आणि वनसंवर्धनाला बळ देणारा ठरत आहे.
विभागीय व्यवस्थापक डॉ. एस. एन. नेवसे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सहाय्यक व्यवस्थापक, घटक क्रमांक १ व २ यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये वन अधिकारी, वन कर्मचारी आणि स्थानिक ग्रामस्थांनी सहभाग घेतला.
पावसाळ्यात नैसर्गिक नाले व ओढ्यांमधून वाहून जाणारे पाणी अडवून ते जमिनीत मुरविणे, जमिनीतील ओलावा टिकविणे आणि भूजल पुनर्भरणास चालना देणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या माध्यमातून जंगल परिसरातील पाण्याची उपलब्धता वाढण्यास मदत होणार असून वन्यजीव आणि पशुधनालाही त्याचा लाभ मिळणार आहे. या उपक्रमांतर्गत झरी कार्यकेंद्रातील आंबापाणी, झरी व बाडगी; आंबा कार्यकेंद्रातील शिवशेत आंबा व घुबडसाका; रायता कार्यकेंद्रातील कडेगहाण, भुतमोखाडा, कचरपाडा व खरवळ; बोरीपाडा कार्यकेंद्रातील बेहेडपाडा, पांगुळघर, मानकापूर व खरपडी; नाशिक कार्यकेंद्रातील शिवणगाव व घोटी; तसेच दिंडोरी कार्यकेंद्रातील मोहपाडा, कुंडाणे, वाघाड व बालापूर या गावांमध्ये माती व वनराई बंधाऱ्यांची उभारणी करण्यात आली आहे.
बंधाऱ्यांमुळे पावसाचे पाणी अडवून जमिनीत जिरविण्यास मदत होणार आहे. परिणामी, भूजल पातळीत वाढ होण्यासह जमिनीतील ओलावा दीर्घकाळ टिकून राहणार आहे. नव्याने लागवड केलेल्या रोपांच्या वाढीसाठीही पोषक वातावरण निर्माण होणार आहे. विशेषतः उन्हाळ्याच्या काळात वन्यप्राणी, गुरेढोरे व अन्य पशुधनासाठी पाण्याची उपलब्धता वाढण्यास या उपक्रमाचा उपयोग होणार आहे. त्यामुळे वनसंवर्धन, जैवविविधतेचे संरक्षण आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यास हातभार लागणार आहे.
या उपक्रमामुळे ग्रामस्थांमध्ये जंगल आणि नैसर्गिक साधनसंपत्तीच्या संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण होत आहे. वनसंवर्धन ही केवळ वन विभागाची जबाबदारी नसून त्यामध्ये स्थानिक ग्रामस्थांचाही सक्रिय सहभाग महत्त्वाचा आहे, ही भावना अधिक दृढ होत आहे. वन विभाग आणि ग्रामस्थ यांच्या समन्वयातून राबविण्यात येणारा हा उपक्रम ग्रामीण भागातील जलसंधारण आणि शाश्वत पर्यावरण संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण ठरत आहे.
फोटो गॅलरी














Leave a Reply