दुष्काळाची तीव्रता लक्षात घेऊन राज्यातील ३०४ तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आले होते आणि शेतकऱ्यांना पाच हजार रुपयांची मदत देण्याची घोषणा झाली होती. ही मदत दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. त्यानुसार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील २ लाख ३९ हजार ३२० शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मंगळवारअखेर प्रत्येकी पाच हजार रुपयांची अग्रीम मदत जमा करण्यात आली आहे. जिल्ह्यातील नऊ तालुक्यांतील शेतकऱ्यांचा यात समावेश असून ही माहिती जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दिली आहे.
तालुकानिहाय लाभार्थी
जिल्ह्यातील ५ लाख ९२ हजार २७१ शेतकऱ्यांपैकी पहिल्या टप्प्यात २ लाख ३९ हजार ३२० शेतकऱ्यांना ही मदत मिळाली आहे. तालुकानिहाय आकडेवारी अशी आहे: छत्रपती संभाजीनगर १७,०३६, गंगापूर ३२,८५५, कन्नड ३८,१९१, खुलताबाद १०,८०४, पैठण ३२,८०५, फुलंब्री १५,६५०, सिल्लोड ३१,८१५, सोयगाव १४,७२३ आणि वैजापूर ४५,४४१. एकूण ११९ कोटी ६६ लाख रुपयांची अग्रीम मदत वितरित झाली आहे.
उर्वरित शेतकऱ्यांना दोन दिवसांत मदत
ॲग्रिस्टॅक म्हणजेच फार्मर आयडी असलेल्या शेतकऱ्यांना या मदतीसाठी प्राधान्य देण्यात आले असून त्यांना अग्रीम मदत जमा करण्यासाठी मान्यता देण्यात आली होती. जिल्हा प्रशासनाने संबंधित यंत्रणांकडून शेतकऱ्यांचा डेटा उपलब्ध करून घेतला आणि तपासणी व मान्यता प्रक्रिया पूर्ण केली. उर्वरित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दोन दिवसांत ही मदत जमा करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी गौडा यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विभागाचे सर्व अधिकारी सुटीच्या दिवशीही काम करणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply