गंगापूर तालुक्यात यावर्षी कपाशीची वाढ खुंटली असून उत्पादनात मोठी घट होणार आहे. असे असतानाही खुल्या बाजारात कापसाला प्रतिक्विंटल नऊ हजार रुपयांहून अधिक दर मिळत आहे, तर शासकीय केंद्रावर आठ हजार सहाशे रुपये प्रतिक्विंटल भाव आहे. या फरकामुळे शेतकऱ्यांनी शासकीय कापूस खरेदी केंद्राकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे.
यंदा सर्वच पिकांच्या उत्पादनावर परिणाम झाला असून कपाशीची झाडे लहान राहिल्याने एकरी चार ते पाच क्विंटल उत्पादन हाती येण्याची शक्यता आहे. दुसरीकडे कापसाची प्रतवारी चांगली असून कापूस कोरडा असल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
नोंदणीची आकडेवारी
सोमवारपर्यंत गंगापूर कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत शासकीय कापूस खरेदीसाठी केवळ २३ शेतकऱ्यांनीच नोंदणी केली आहे. तर लासूर स्टेशन येथील कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत शासकीय कापूस खरेदीसाठी १६ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. खुल्या बाजारातील चांगला भाव हे नोंदणी कमी राहण्यामागील प्रमुख कारण मानले जात आहे.
भाव वाढण्याची अपेक्षा
हंगामाच्या सुरवातीला कापसाची खरेदी नऊ हजार तीनशे ते नऊ हजार पाचशे रुपये प्रतिक्विंटल दराने सुरू झाली होती. काही दिवसांपासून खुल्या बाजारात भाव कमी झाले असून व्यापाऱ्यांकडून कापूस नऊ हजार ते नऊ हजार शंभर रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी केला जात आहे. कापसाला लवकरच दहा हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत भाव मिळेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आपला माल घरातच साठवून ठेवला आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply