जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गंभीर अवस्थेत दाखल झालेल्या ४५ वर्षीय महिलेची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया डॉक्टरांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथील जिजाबाई राजू पाटील असे या महिलेचे नाव आहे. वेळेवर करण्यात आलेली शस्त्रक्रिया आणि समन्वित उपचार यामुळे तिचा जीव वाचला असून, आता तिची प्रकृती सुधारत आहे.
गंभीर अवस्थेत दाखल, तातडीने उपचार सुरू
जिजाबाई या ११ ऑक्टोबरला पोटदुखी, योनीमार्गातून अतिरक्तस्राव आणि गाठ बाहेर आल्याच्या तक्रारीने रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. अतिरक्तस्रावामुळे त्यांचे हिमोग्लोबिन केवळ ४.९ ग्रॅम इतके खाली आले होते. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करून तातडीने रक्त संक्रमण व आवश्यक उपचार सुरू करण्यात आले. तपासणीत गर्भपिशवीची सुमारे १२ बाय १० बाय १० सेंटीमीटर आकाराची गाठ असल्याचे निदान झाले.
स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागाच्या पथकाने तातडीने शस्त्रक्रिया करून गर्भपिशवी व गाठ काढली. विभागप्रमुख डॉ. शीतल लाड, सहाय्यक प्राध्यापक डॉ. राहुल कातकडे तसेच भूलतज्ज्ञ डॉ. अमित हिवरकर, डॉ. वैभव सोळंके व त्यांच्या सहकाऱ्यांनी शस्त्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावली. अधिष्ठाता डॉ. गिरीष ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली.
उपचारानंतर डिस्चार्ज
वेळेवर केलेली शस्त्रक्रिया, रक्त संक्रमण आणि डॉक्टरांच्या समन्वित प्रयत्नांमुळे महिलेची प्रकृती सुधारली. उपचारानंतर २६ ऑक्टोबर रोजी तिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. उपचारात सहभागी सर्व डॉक्टर, वैद्यकीय पथक व परिचारिकांचे अधिष्ठात्यांनी अभिनंदन केले. गंभीर लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळीच रुग्णालयात पोहोचणे किती महत्त्वाचे असते, हे या घटनेतून पुन्हा अधोरेखित झाले आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply