आयुष वैद्यकीय शिक्षणांतर्गत येणाऱ्या पदवी अभ्यासक्रमांच्या पहिल्या वर्षाच्या प्रवेशासाठी तिसरी गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे. राज्यात एकूण ६ हजार ६३४ जागा रिक्त असताना या यादीच्या माध्यमातून ५ हजार ९६१ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये सर्वाधिक संख्येने आयुर्वेद अभ्यासक्रमाचे इच्छुक आहेत. आयुर्वेदासाठी सुमारे चार हजार विद्यार्थ्यांना संधी मिळाली आहे, तर होमिओपॅथीसाठी सोळाशेहून अधिक विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
तीन अभ्यासक्रमांची एकत्रित स्थिती
आयुर्वेद, होमिओपॅथी आणि युनानी या तीनही अभ्यासक्रमांसाठी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेतून जागावाटपाची तिसरी यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. राज्यातील २०४ वैद्यकीय महाविद्यालयांमधील एकूण १३ हजार ७५० जागांपैकी पहिल्या आणि दुसऱ्या फेरीत ७ हजार ११६ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला होता. प्रतीक्षेत असलेल्या ५ हजार ९६१ विद्यार्थ्यांना तिसऱ्या यादीत संधी देण्यात आली आहे. त्यानंतरही ६७३ जागा रिक्त राहणार असून त्या स्ट्रे राऊंडसाठी उपलब्ध असतील.
होमिओपॅथी अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या यादीत राज्यातील ५७ महाविद्यालयांमधील ४ हजार ०१९ जागांपैकी १ हजार ८४७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. तिसऱ्या फेरीत १ हजार ६८३ विद्यार्थ्यांना संधी मिळाली असून ४८९ जागा रिक्त आहेत. युनानी अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या यादीत राज्यातील ८ महाविद्यालयांमधील ४२८ जागांपैकी २२८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. तिसऱ्या फेरीत १९३ विद्यार्थ्यांना संधी मिळाली असून केवळ सात जागा रिक्त राहात आहेत.
आयुर्वेदच्या ५४ टक्के जागांवर प्रवेश
आयुर्वेद अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या यादीत राज्यातील उपलब्ध ९ हजार ३०३ जागांपैकी ५ हजार ०४१ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. म्हणजेच साधारण ५४ टक्के जागांवर प्रवेश झाले असून तिसऱ्या फेरीत ४ हजार ०८५ विद्यार्थ्यांना संधी मिळाली आहे. यामध्ये १७७ जागा रिक्त आहेत. सहा शासकीय महाविद्यालयांमध्ये ३२९, शासकीय अनुदानित आणि महापालिकेच्या १७ महाविद्यालयांमध्ये ८६०, तर विनाअनुदानित ११६ महाविद्यालयांमध्ये २ हजार ८९६ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे.
तिसऱ्या फेरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी संबंधित महाविद्यालयात बुधवारी, ४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत आवश्यक मूळ कागदपत्रे आणि धनाकर्षाद्वारे शुल्क प्रत्यक्ष उपस्थित राहून जमा करून प्रवेश निश्चित करायचा आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply