शुक्रवार, ३० ऑक्टोबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

त्र्यंबकेश्वर येथे ३० व ३१ ऑक्टोबरपर्यंत प्रतिबंधात्मक मनाई आदेश

त्र्यंबकेश्वर येथे ३० व ३१ ऑक्टोबरपर्यंत प्रतिबंधात्मक मनाई आदेश

जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी आयुष प्रसाद यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ मधील कलम १६३ व १६३ (२) अन्वये ३० ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १२ वाजेपासून ते ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत अथवा कार्यक्रम संपेपर्यंत, यापैकी जे नंतर घडेल तोपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळाच्या पार्श्वभूमीवर ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी होणाऱ्या नियोजित कार्यक्रमाच्या अनुषंगाने भाविकांची सुरक्षा, गर्दीचे नियोजन आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाने आवश्यक उपाययोजना केल्या आहेत.

त्र्यंबकेश्वर येथे ३० व ३१ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपती महोदया यांच्या उपस्थितीत विविध नियोजित कार्यक्रम होणार आहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची सुरक्षा सुनिश्चित करणे, गर्दीचे नियोजन व नियंत्रण करणे आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे आवश्यक आहे. या अनुषंगाने नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक, त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे सचिव आणि संबंधित यंत्रणांनी सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्याबाबत अभिप्राय सादर केले आहेत.

३० ऑक्टोबर २०२६ रोजी संपूर्ण दिवस तसेच ३१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत त्र्यंबकेश्वर मंदिरातील दर्शनव्यवस्था शहरातील रहिवासी वगळता इतर सर्व भाविकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनाकडून वितरित करण्यात आलेल्या अधिकृत दर्शन पासधारकांनाच दर्शनासाठी प्रवेश दिला जाणार आहे. अधिकृत दर्शन पास नसलेल्या नागरिकांना दर्शनासाठी प्रवेश दिला जाणार नसल्याचे त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने स्पष्ट केले आहे.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, नाशिक येथे २७ ऑक्टोबर २०२६ रोजी झालेल्या बैठकीत पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण, त्र्यंबकेश्वरचे मुख्याधिकारी आणि त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे सचिव यांच्याकडून प्राप्त अभिप्रायाच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे. भाविकांची सुरक्षितता, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची सुरक्षा आणि गर्दीचे प्रभावी नियंत्रण यासाठी प्रशासनाने हे निर्बंध लागू केले आहेत. नागरिकांनी व भाविकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन अपर जिल्हादंडाधिकारी रोहितकुमार राजपूत यांनी केले आहे.

विशाल राजपूत

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance