ठाणेकरांच्या दिवाळीला यंदा प्रादेशिक मनोरुग्णालयातील रुग्णांच्या कलेची वेगळी झळाळी लाभणार आहे. रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांनी मेहनतीने तयार केलेल्या दिवाळीच्या वस्तू बाह्यरुग्ण विभागात विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. रंगीबेरंगी पणत्या, आकर्षक आकाशकंदील, सुगंधी उटणे, तोरणे आणि रांगोळ्या अशा विविध वस्तू यात आहेत. नागरिकांकडून या वस्तूंना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले आहे.
रुग्णांनी तयार केलेल्या वस्तू
दिवाळीनिमित्त रुग्णालयाच्या व्यवसायोपचार विभागातर्फे रुग्णांकडून विविध आकर्षक वस्तू तयार करून घेण्यात आल्या. मातीच्या पणत्या रंगविण्यापासून ते मोर आणि कमळाच्या आकारातील दिवे सजविण्यापर्यंत रुग्णांनी आपले कौशल्य दाखवले. आकाशकंदील, तोरणे, सुगंधी उटणे, फुलवाती, अरोमा कँडल्स आणि लोकरीच्या रांगोळ्यांचाही यात समावेश आहे. महिला विभागातील रुग्णांनी उटण्याची पाकिटे, तोरणे आणि रांगोळ्या तयार केल्या आहेत. यंदा रुग्णालयाची सजावटही रुग्णांनी तयार केलेल्या वस्तूंनीच केली जाणार असून, आवारात आकाशकंदील, पताका आणि तोरणांच्या माळा लावून सणाचा उत्साह निर्माण केला जाणार आहे.
उपचारासोबत कौशल्यविकास
रुग्णांनी तयार केलेल्या वस्तू दिवाळीनिमित्त प्रदर्शन आणि विक्रीसाठी ठेवल्या जातात. त्यातून रुग्णांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळते, तसेच त्यांच्या कामाला आर्थिक मोबदलाही मिळतो. व्यवसायोपचार हा उपचारप्रक्रियेतील महत्त्वाचा भाग असून, त्यातून रुग्णांची एकाग्रता, आकलनक्षमता आणि कामातील सुसूत्रता वाढविण्याचा प्रयत्न केला जातो. उपचारानंतर रुग्णांना दैनंदिन जीवनात स्वावलंबी होण्यासाठी अशा उपक्रमांचा उपयोग होतो, असे रुग्णालयाचे म्हणणे आहे. या उपक्रमासाठी वैद्यकीय अधीक्षक डॉ. नेताजी मुळीक, डॉ. सुधीर पुरी, डॉ. जानवी केरझरकर, डॉ. आश्लेषा कोळी यांच्यासह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले आहेत.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply