बीड तालुक्यात एक नवी, भव्य औद्योगिक वसाहत उभारण्याच्या हालचालींना वेग आला असून, यामुळे बीडच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासाचे नवे पर्व सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राजुरी घोडका येथे तब्बल १३५.०७ हेक्टर क्षेत्रावर नवीन एमआयडीसी उभारण्याचा महत्त्वाकांक्षी प्रस्ताव पुढे आला आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक कार्यालयाने यासंदर्भातील अधिकृत प्रस्ताव सादर केला आहे. या प्रकल्पामुळे जिल्ह्याच्या औद्योगिक भरभराटीची दारे खुली होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
जमिनीची पडताळणी आणि ना-हरकत प्रमाणपत्र
सध्या या प्रस्तावानुसार राजुरी घोडका येथील संबंधित जमिनींच्या गट क्रमांकांची सविस्तर यादी जलसंपदा विभागाकडे पाठवण्यात आली आहे. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या बीड पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंते यांनी या जमिनींची प्रत्यक्ष स्थल पाहणी करण्याचे आदेश दिले आहेत. प्रस्तावित जमीन एखाद्या पाटबंधारे प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात, बुडीत क्षेत्रात किंवा आधीच संपादित केलेल्या क्षेत्रात तर येत नाही ना, याची अचूक पडताळणी आता केली जात आहे. ही स्थल पाहणी पूर्ण झाल्यानंतर पाटबंधारे विभागाकडून ना-हरकत प्रमाणपत्र आणि अंतिम अहवाल विभागीय कार्यालयाकडे सादर केला जाईल. हा अहवालच प्रकल्पाच्या पुढील वाटचालीसाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहे. या प्रक्रियेमुळे स्थानिक नागरिक आणि सुशिक्षित तरुणांच्या आशा उंचावल्या असून, सर्वांचे लक्ष आता शासनाच्या अंतिम निर्णयाकडे लागले आहे.
स्थानिक तरुणांना रोजगाराची आशा
राजुरी घोडका येथे एमआयडीसी उभी राहिल्यास स्थानिक पातळीवरच शेकडो नवीन उद्योग सुरू होतील, अशी अपेक्षा आहे. यामुळे हजारो तरुणांना थेट रोजगार मिळेल आणि त्यांचा बेरोजगारीचा प्रश्न सुटण्यास मदत होईल. रोजगारासाठी होणारे स्थलांतर थांबेल आणि जिल्ह्याच्या एकूणच अर्थकारणाला एक मजबूत, सकारात्मक गती मिळेल, असे सांगितले जात आहे. राजुरी घोडका हे गाव बीड शहरापासून साधारण ९ किलोमीटर अंतरावर असून बीड-परळी महामार्गालगत येते. शहराशी आणि मुख्य महामार्गाशी चांगला संपर्क असल्यानेच नवीन एमआयडीसी उभारणीसाठी या भागाची निवड केली गेली आहे. या गावचे एकूण भौगोलिक क्षेत्रफळ सुमारे ८९० ते ९०० हेक्टरच्या आसपास असून, त्यापैकी तब्बल १३५.०७ हेक्टर जमीन आता नवीन औद्योगिक वसाहतीसाठी प्रस्तावित आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply