कांदिवली पूर्वेतील अशोकनगर येथील महापालिका मराठी शाळेलगत असलेल्या लाल मातीच्या मैदानाची नवरात्रोत्सवानंतर दयनीय अवस्था झाली आहे. उत्सव संपून आठवडा उलटला, तरी मैदानाची स्वच्छता आणि पूर्ववत दुरुस्ती न झाल्याने ठिकठिकाणी मातीचे ढिगारे, खडी, लाकडी पट्ट्या, काठ्या आणि प्लॅस्टिकचा कचरा पडून आहे. त्यामुळे मैदानात खेळण्यासाठी येणाऱ्या मुलांसह व्यायामासाठी येणारे नागरिक आणि महिलांची गैरसोय होत आहे. या प्रकाराला आयोजकांचे दुर्लक्ष कारणीभूत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
एकमेव मैदान, वर्षभर कार्यक्रम
अशोकनगर आणि अण्णानगर परिसरातील नागरिकांसाठी हे एकमेव मैदान आहे. सकाळी आणि संध्याकाळी येथे मुले खेळण्यासाठी, तर महिला आणि पुरुष चालणे, योगासने व व्यायाम करण्यासाठी येतात, मात्र या मैदानावर वर्षभर विविध सार्वजनिक कार्यक्रमांना परवानगी दिली जात असल्याने नागरिकांना त्याचा नियमित वापर करता येत नसल्याची तक्रार आहे. श्रीगणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलाव उभारणे आणि त्यानंतर नवरात्रोत्सव साजरा करणे, अशा कार्यक्रमांमुळे मैदान अनेक दिवस वापराविना राहते.
नुकत्याच झालेल्या नवरात्रोत्सवासाठी मंडप, व्यासपीठ आणि लाकडी फरशा उभारण्यात आल्या होत्या. उत्सव संपल्यानंतर या साहित्याची विल्हेवाट लावण्यात आली; मात्र मैदानात सुमारे एक फुटापर्यंत उंचीचे मातीचे ढिगारे, खडी आणि लाकडी साहित्य शिल्लक आहे. त्यामुळे मैदानावर उंच-सखल भाग तयार झाले असून, मुलांना खेळताना दुखापत होण्याची भीती आहे. मैदानाची तातडीने स्वच्छता करून ते पूर्ववत करावे आणि संबंधित आयोजकांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी अशोकनगर व अण्णानगरमधील महिलांसह नागरिकांनी केली आहे.
पालिकेची भूमिका
याप्रकरणी महापालिकेचे प्रशासकीय अधिकारी अशफाक शाह म्हणाले, “स्वतः मैदानाची पाहणी करून संबंधित विभाग आणि अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात येईल. योग्य ती कारवाई लवकरच केली जाईल. तसेच मैदानाची स्वच्छता करण्यात येईल.” हे परिसरातील एकमेव मैदान असल्याने सकाळी आणि संध्याकाळी येथे मुले, महिला व नागरिकांची गर्दी असते, मात्र विविध कार्यक्रमांमुळे मैदानाची दुरवस्था झाली आहे. पालिकेने आयोजकांवर योग्य ती कारवाई करून मैदान पुन्हा सुसज्ज करावे, असे समाजसेवक विजय बडगे यांनी म्हटले आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply