सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर शहराचा कायापालट घडवण्याची कामे वेगाने सुरू आहेत. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला शहरातील कचरा डेपो स्थलांतरित करण्याचा विषय पालिका व कुंभमेळा प्राधिकरणाने प्रथम मार्गी लावला आहे. दुर्गंधीमुक्त शहर ही संकल्पना प्रत्यक्षात उतरल्यानंतर शहराच्या सुशोभीकरणासह भाविकांना दर्शन सुलभ होण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.
पेगलवाडी येथे नवीन ४.२ किलोमीटर लांबीच्या घाटांची निर्मिती केली जात असून त्यातून कुशावर्त तीर्थावर होणाऱ्या गर्दीचे नियोजन करणे शक्य होणार आहे. दर्शन पथाच्या कामासाठी पालिकेने अतिक्रमण निर्मूलन मोहीम मोठ्या प्रमाणात राबवली असून त्र्यंबकराज मंदिर परिसर मोकळा झाल्यामुळे दर्शनपथाच्या कामांना गती मिळत आहे. नाशिक ते त्र्यंबकेश्वर रस्ता पूर्णतः सिमेंटचा बनवला जात आहे.
प्रमुख विकासकामे प्रगतिपथावर
शहरातील प्रस्तावित रिंग रोड, नवीन पाणीपुरवठा योजना, घनकचरा व्यवस्थापन, सीएसआरच्या माध्यमातून कुशावर्त तीर्थाचा विकास, शहरातील सात तलावांचा विकास आणि प्राचीन मंदिरांचे संवर्धन ही प्रमुख कामे प्रगतिपथावर आहेत. त्र्यंबकेश्वर शहराची लोकसंख्या २५ हजार असली तरी नियमितपणे येणाऱ्या भाविकांचे प्रमाण २५ हजारांवर असते. त्यामुळे त्यांना मूलभूत सुविधा पुरवताना पालिकेला मर्यादा येतात. सिंहस्थाच्या निमित्ताने या अडचणी दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नवीन योजनेचे काम सुरू असून भविष्यातील वाढती लोकसंख्या व भाविकांची संख्या विचारात घेऊन ही योजना आखली आहे. बेझे येथील धरणातून पाणी त्र्यंबकेश्वरपर्यंत आणले जाईल. नीलगिरी पर्वतालगत असलेल्या पाण्याच्या टाकीपासून त्याचे विभाजन केले जाणार आहे. त्र्यंबकेश्वर पालिकेची अत्यंत प्राचीन इमारत पाडून त्याच ठिकाणी नवीन भव्य इमारत उभारण्याचे नियोजन असून त्याची घोषणा उपमुख्यमंत्र्यांनी नुकतीच केली आहे.
महत्त्वाच्या कामांसाठी कोट्यवधींचा निधी
काँक्रीट रस्ते, पर्जन्य जलवाहिन्या आणि विद्युत डकसाठी ८९.८१ कोटी, पाणीपुरवठा योजनेसाठी ६४.२१ कोटी, घनकचरा व्यवस्थापनासाठी ११.०३ कोटी, कुशावर्त तीर्थ विकास, गौतमी तलाव व मंदिर संवर्धनासाठी ३६.९२ कोटी, उपसा जलसिंचन योजनेसाठी ३२८ कोटी आणि दर्शन पथ व नवीन रस्त्यासाठी २५० कोटी रुपयांची कामे हाती घेण्यात आली आहेत. प्रत्येक भाविकाला हे शहर स्वच्छ आणि सुंदर दिसावे यासाठी प्लॅस्टिकमुक्त शहर ही संकल्पना लवकरच राबवली जाणार आहे. महसूल प्रशासन, पोलिस अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी, पुरोहित संघ आणि आखाड्यांचे साधु-महंत यांच्या सहकार्यातून शहरातील कामे झपाट्याने सुरू आहेत.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply