सिन्नर तालुक्यातील प्रभाग क्रमांक ४ मधील खळवाडी गावातील रहिवासी गावपाटाच्या दुर्गंधीने बेजार झाले आहेत. लोंढी गल्लीतील भद्रकाली मंदिरापासून ते खळवाडीपर्यंत आणि शिर्डी महामार्गापासून ते लिंगटांगवाडीपर्यंत पसरलेला हा आदिवासीबहुल प्रभाग आहे. जवळच असलेल्या अण्णा भाऊ साठे नगरात पुरेसे पाणी मिळत नसल्याने तेथील नागरिकांमध्येही तीव्र संताप आहे.
या प्रभागातील आंबेडकर नगरातील रस्ते बऱ्यापैकी चांगले असून सांडपाण्याची व्यवस्थाही बरी आहे. मात्र, खळवाडीत सर्वात मोठी समस्या गावपाटाची बनली आहे. उघड्या पाटामुळे संपूर्ण परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरल्याने नागरिकांना नाक दाबून वावरावे लागत आहे. पाटाच्या लगत राहणाऱ्यांचे जगणे अत्यंत अवघड झाले असून डास व कीटकांचा प्रादुर्भाव वाढल्याने आरोग्याचा प्रश्न कायम आहे. त्यामुळे हा पाट बंदिस्त करण्यात यावा, अशी आग्रही मागणी नागरिकांकडून होत आहे.
वीज आणि पाण्याची दुहेरी कोंडी
हा प्रभाग विजेच्या लपंडावानेही त्रस्त आहे. नळाला पाणी सुटले की नेमकी वीज गायब होते. घरावर पाण्याच्या टाक्या नसल्याने आणि साठवणुकीची सुविधा नसताना इमारतींवर पाणी कसे चढावे, असा प्रश्न रहिवाशांसमोर उभा आहे. परिसरातील वीज रोहित्रांची क्षमता वाढवण्याची गरज आहे. लिंगटांगवाडीत अंतर्गत रस्ते होण्याची गरज असून हा परिसर शेतीला लागून असल्याने तिथे बिबट्याचा कायम वावर असतो. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने पथदीपांची यंत्रणा अधिक सक्षम करण्याची मागणी जोर धरत आहे.
मोर्चे काढूनही पाणीप्रश्न कायम
अण्णा भाऊ साठे नगरातील नागरिकांनी प्रशासनाकडे मोर्चे काढले आणि निवेदने दिली, तरीही अपुऱ्या पाणीपुरवठ्याची समस्या सुटलेली नाही. समोरच्या गल्लीत पाण्याचा दाब जास्त आणि साठे नगरात अतिशय कमी पाणी, अशी विषमतापूर्ण स्थिती आहे. यावर कोणताही ठोस तोडगा निघत नसल्याने नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात नाराजी आहे. पाणी कधी चार तर कधी सहा दिवसांनी येते आणि येण्याची वेळही निश्चित नसल्याने नागरिकांचा बराचसा वेळ पाण्याची वाट पाहण्यातच जातो.
प्रभागासाठी खळवाडीतील गावपाट बंदीस्तीचे काम मंजूर झाले असून पथदीपांची व्यवस्था अधिक सक्षम होणार आहे. लिंगटांगवाडीत अंतर्गत रस्त्यांची कामे मंजुरीला आहेत, तर आंबेडकर नगरात मरीमाता मंदिरासाठी प्रस्ताव असून टर्फची उभारणी होणार आहे. गावपाटाच्या त्रासापासून लवकरच सुटका होणार असून प्रभागातील रस्ते जास्तीत जास्त प्रमाणात पूर्ण केले जाणार असल्याचे लोकप्रतिनिधींनी सांगितले आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply