बारावीच्या विद्यार्थ्यांना यंदा राज्य सामायिक प्रवेश परीक्षा दोनदा देता येणार आहे. डिसेंबरमध्ये प्रस्तावित असलेली सीईटी परीक्षा उच्च व तंत्रशिक्षण विभागाने रद्द केली आहे. आता दोन्ही सीईटी परीक्षा बारावीच्या बोर्ड परीक्षेनंतर आयोजित केल्या जाणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना बारावीच्या अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळणार असून बोर्ड परीक्षा आणि सीईटीची तयारी एकाच वेळी करण्याचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे. वेळापत्रक लवकरच जाहीर होईल, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या सूत्रांनी दिली आहे.
दोन संधींचा उद्देश
अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी महत्त्वाची मानली जाते. विद्यार्थ्यांना परीक्षेतील कामगिरी सुधारण्याची आणखी एक संधी मिळावी, या उद्देशाने वर्षातून दोनदा सीईटी घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. बोर्ड परीक्षेपूर्वी सीईटीची तयारी करण्यासाठी स्वतंत्र वेळ काढण्याची कसरत आता विद्यार्थ्यांना करावी लागणार नाही.
दोन्ही परीक्षांत चार आठवड्यांचे अंतर
दोन्ही सीईटी परीक्षांमध्ये चार आठवड्यांचे अंतर ठेवण्याचे नियोजन आहे. त्यामुळे पहिली परीक्षा दिल्यानंतर विद्यार्थ्यांना आपल्या कामगिरीचे मूल्यमापन करता येईल आणि ज्या विषयांमध्ये किंवा घटकांमध्ये गुण कमी मिळाले, त्यावर अधिक मेहनत घेता येईल. मात्र दोन्ही परीक्षांतील कोणते गुण प्रवेशासाठी ग्राह्य धरले जाणार, याबाबत शासनाने खुलासा करावा, अशी अपेक्षा विद्यार्थ्यांकडून व्यक्त होत आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply