मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेत असलेले ज्येष्ठ नेते शरद पवार यांची उद्योजक गौतम अदानी यांनी शनिवारी भेट घेतली. सकाळी साधारण अकरा वाजता रुग्णालयात दाखल झालेले अदानी दुपारी साधारण एक वाजता बाहेर पडले. या दोन तासांच्या भेटीत दोघांमध्ये नेमकी कोणती चर्चा झाली, याचा तपशील अद्याप समोर आलेला नाही.
शरद पवार यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे ते सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. अदानी यांनी रुग्णालयात येऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. देशातील आघाडीच्या उद्योजकांपैकी एक असलेले अदानी दोन तास रुग्णालयात थांबल्यामुळे या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
डिलिमिटेशन विधेयकाच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व
संसदेच्या विशेष अधिवेशनात येत्या सोमवारी लोकसभेत मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मांडले जाणार आहे. गेल्या अधिवेशनात हे विधेयक हाणून पाडले गेले होते. घटनादुरुस्ती स्वरूपाचे हे विधेयक मंजूर होण्यासाठी दोन तृतीयांश म्हणजेच 360 मतांची आवश्यकता आहे.
ही मते जमवण्यासाठी भाजपने शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस, द्रमुक यांच्यासह काही पक्षांशी चर्चा केली आहे. शरद पवार यांची राष्ट्रवादी या विधेयकाला पाठिंबा देण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आणि महाविकास आघाडीच्या गोटात खळबळ उडाली आहे. मात्र शरद पवार यांची या विधेयकाबाबतची नेमकी भूमिका अद्याप समोर आलेली नाही.
भेटीतील चर्चा गुलदस्त्यात
डिलिमिटेशनच्या मुद्द्यावर राज्य आणि केंद्र पातळीवर महत्त्वाच्या राजकीय घडामोडी सुरू असताना ही भेट झाली असल्याने तिच्याकडे लक्ष लागले आहे. दोन तासांच्या भेटीत उभयतांमध्ये कोणत्या विषयांवर चर्चा झाली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या भेटीबाबत अधिक माहिती समोर येण्याची प्रतीक्षा आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा