मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावरून राज्याच्या राजकारणात नवी खळबळ उडाली आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने या विधेयकाला पाठिंबा दिल्याची चर्चा सुरू असतानाच, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील एका ज्येष्ठ नेत्याने वेगळीच भूमिका मांडली आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष आण्णासाहेब बनसोडे यांनी सोलापूर जिल्ह्यातील माढा दौऱ्यादरम्यान केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
बनसोडे नेमकं काय म्हणाले?
बनसोडे म्हणाले की, अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष डिलिमिटेशनच्या बाजूने एनडीएसोबत जाणार नाही. या विषयावर अजून बरंच पाणी पुलाखालून जाणार आहे, असंही ते म्हणाले. येत्या दोन दिवसांत डिलिमिटेशनबाबतचं संपूर्ण चित्र स्पष्ट होईल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या विधेयकाबाबत जो निर्णय घेतील, त्यांच्या मागे पक्षाचे आमदार आणि खासदार उभे राहतील, असं बनसोडे यांनी स्पष्ट केलं. विशेष म्हणजे, त्यांच्या या वक्तव्याची खातरजमा करण्यासाठी त्यांना पुन्हा विचारण्यात आलं, तरीही त्यांनी आपलं म्हणणं मागे घेतलं नाही.
शरद पवार गटाबाबत संभ्रम कायम
शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने एनडीएसोबत जाण्याचा निर्णय अजून घेतलेला नाही, असं बनसोडे म्हणाले. त्यांनी असा निर्णय कुठेही जाहीर केलेला नाही, असंही त्यांनी नमूद केलं. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या टीकेवर बोलताना बनसोडे म्हणाले की, विरोधी पक्षनेत्याने टीका करणं स्वाभाविक आहे. मात्र शरद पवार यांनी एनडीएसोबत जाण्याचा निर्णय घेतलेला नाही, असं त्यांनी ठामपणे सांगितलं. बनसोडे यांच्या या वक्तव्यानंतर राज्यभर चर्चा सुरू झाली असून, राजकीय चित्र नेमकं काय असेल हे स्पष्ट होण्यासाठी आणखी दोन दिवस लागतील, असं त्यांनी सांगितलं.
प्रतिक्रिया व्यक्त करा