मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावरून काँग्रेसमध्ये दोन वेगळी मतं समोर आली आहेत. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी डिलिमिटेशन झालंच पाहिजे, अशी भूमिका मांडली आहे. बराच काळ गेला असून, लोकसंख्या जशी वाढते तसे प्रतिनिधी मिळायला पाहिजेत, असं ते म्हणाले.
सुशीलकुमार शिंदे काय म्हणाले?
सुशीलकुमार शिंदे म्हणाले की, डिलिमिटेशन सर्वसंमतीने झालं असतं तर फार बरं झालं असतं. राष्ट्रवादीची काय भूमिका आहे, यावर आपण बोलू शकत नाही, कारण आमचा आणि त्यांचा पक्ष वेगळा आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. लोकसंख्या वाढली असताना त्यानुसार प्रतिनिधींची संख्या वाढणं गरजेचं असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.
प्रणिती शिंदे यांची टीका काय?
दुसरीकडे, काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी या विधेयकाच्या संदर्भात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भूमिकेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राष्ट्रवादी पक्ष देशाशी आणि संविधानाशी गद्दारी करत असल्याची खोचक टीका त्यांनी केली असून, पवार यांची नेमकी काय मजबुरी आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. ही गद्दारी केवळ काँग्रेस किंवा इंडिया ब्लॉकसोबत नाही, तर संविधानाशी आहे, असं प्रणिती शिंदे म्हणाल्या. ज्या लोकांनी पुरोगामी विचारसरणीला मतदान केलं, त्या विचारसरणीच्या विरोधात राष्ट्रवादी जात असल्याचा आरोप त्यांनी केला. देशात जे असंवैधानिक आहे, त्याला पाठिंबा दिला जात असल्याचंही त्या म्हणाल्या. राष्ट्रवादीला नेहमी काँग्रेसने साथ दिली आहे, असं सांगत त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पक्षाच्या भूमिकेच्या विरोधात जाण्याची हिम्मत ठेवावी, असं आवाहन केलं. आपल्या संपर्कात राष्ट्रवादीचे काही खासदार असल्याचंही त्यांनी सांगितलं. जिथे देशाच्या अखंडतेचा प्रश्न उद्भवतो, तिथं आम्ही डिलिमिटेशनच्या विरोधात जाणार, असंही प्रणिती शिंदे म्हणाल्या. काँग्रेसने जेव्हा डिलिमिटेशन केलं, तेव्हा खासदारांची संख्या वाढली नव्हती. आजही 2011 च्या जनगणनेप्रमाणे डिलिमिटेशन घेतलं जात असून, एवढी घाई कशासाठी, असा सवाल त्यांनी केला. प्रस्थापित नेत्यांना त्यांच्या जागा महिलांना द्यायच्या नाहीत, असा आरोपही त्यांनी केला.
प्रतिक्रिया व्यक्त करा