केंद्र सरकारने ३० नोव्हेंबरपासून संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची घोषणा केल्यानंतर डिलिमिटेशन म्हणजेच मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. हे विधेयक घटनादुरुस्ती विधेयक असल्यामुळे लोकसभेत ते मंजूर करवून घेण्यासाठी भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला दोन तृतीयांश बहुमताची म्हणजे ३६० खासदारांच्या मतांची आवश्यकता आहे. पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी केंद्र सरकारने मांडलेले हे विधेयक हाणून पाडले होते. मात्र, आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससह, द्रमुक व अन्य पक्षांच्या भूमिकेत बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. याशिवाय, शिंदे सेनेने ठाकरे गटाचे सहा खासदार फोडल्यामुळे लोकसभेतील त्यांचे संख्याबळ वाढले असून याचा फायदा एनडीएला होणार आहे.
एनडीएचे संख्याबळ किती?
लोकसभेत एनडीएचे एकूण संख्याबळ सध्या ३२१ असल्याचे समोर आले आहे. यात भाजपचे २४१, तेलुगू देसम पक्षाचे १६, शिवसेना (एकनाथ शिंदे) यांचे १३ आणि जनता दल (युनायटेड) यांचे १२ खासदार आहेत. याशिवाय लोक जनशक्ती पक्षाचे ५, जनता दल (धर्मनिरपेक्ष) आणि जनसेना पक्षाचे प्रत्येकी २, तर राष्ट्रीय लोकदल, अपना दल, आसाम गण परिषद, एजेएसयू पक्ष, हिंदुस्तानी अवाम मोर्चा, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा आणि यूपीपीएल यांचा प्रत्येकी १ खासदार आहे. मागील वेळी मदत केलेल्या वायएसआर काँग्रेसचे ४ आणि एका अपक्ष खासदाराचे मत धरले, तर हे संख्याबळ ३२६ पर्यंत जाते. इंडिया आघाडीतून एनडीएला पाठिंबा देण्याची शक्यता असलेल्या द्रमुकचे २२ आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) यांचे ८ खासदार मिळाले, तर एकूण संभाव्य संख्याबळ ३५६ पर्यंत पोहोचते. तरीही आवश्यक ३६० मतांपर्यंत पोहोचण्यासाठी आणखी मतांची गरज भासणार आहे.
विरोधकांची भूमिका काय?
आम आदमी पक्षाने डिलिमिटेशन विधेयकाला महिला आरक्षण विधेयकाशी जोडून मांडण्यास विरोध केला आहे. सध्या लोकसभेच्या असलेल्या जागांमध्ये महिलांना आरक्षण देण्याची मागणी पक्षाने केली आहे. इंडिया आघाडीतील उर्वरित घटक पक्षांनीही सध्या लोकसभेच्या असलेल्या जागांमध्ये महिलांना आरक्षण द्या, डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा नाही, अशी भूमिका घेतली आहे. समाजवादी पक्षाने डिलिमिटेशन हा देशाच्या जनतेकडून सत्ता हिरावून घेण्यासाठी रचलेला कट असल्याचा आरोप करत प्रत्येक देशप्रेमी लोकशाहीवादी पक्षाने सभागृहात डिलिमिटेशनला विरोध करावा, असे म्हटले आहे. त्यामुळे विशेष अधिवेशनात या विधेयकावर जोरदार चर्चा होण्याची शक्यता आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा