शरद पवार यांनी मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला विरोध केला असता तर इतिहासात त्यांची नोंद ‘शेलारमामा’ म्हणून झाली असती. ते राजासोबत ठामपणे उभे राहिले, असे इतिहासात नोंदवले गेले असते, असे वक्तव्य ठाकरे गटाचे लोकसभेतील खासदार अरविंद सावंत यांनी केले. ते शनिवारी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
वडेट्टीवारांच्या टीकेवर सावंत यांची प्रतिक्रिया
विजय वडेट्टीवार यांनी सकाळी शरद पवार यांच्यावर टीका करताना पवारांचा इतिहास खंजीर खुपसण्याचा आहे, असे म्हटले होते. याबाबत अरविंद सावंत यांना विचारले असता त्यांनी म्हटले की, हा शब्द माझ्या पातळीवर वापरणे योग्य वाटत नाही. पण पक्ष सोडणे त्यांनी बऱ्याचदा केले आहे. देशातील बुजुर्ग व्यक्तीबद्दल असे शब्द वापरू नयेत. त्यांची प्रकृती ठीक नाही. त्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी, असे अरविंद सावंत यांनी म्हटले.
विधेयकाला आमचा १०० टक्के विरोध: सावंत
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतलेला निर्णय घोषित केलेला दिसत नाही. मात्र, घडामोडी अशा दिसत आहेत की, काहीतरी गडबड सुरू आहे, असे सावंत म्हणाले. आम्ही इतक्या प्रेमाने एकत्र आलो होतो. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका आम्ही एकजिनसीपणाने लढल्या. उद्धव ठाकरे यांनी उभा महाराष्ट्र पिंजून काढला होता. तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्याही जास्त जागा आल्या होत्या. त्यावरून उद्धव ठाकरे म्हणाले होते की, पारिजात माझ्या दारी फुले पडती शेजारी.
डिलिमिटेशन बिलामध्ये एक तरतूद अशी होती की २०२३ ची जनगणना होईल तेव्हा त्याची अंमलबजावणी करायची होती. मात्र, ही जनगणना झाली नाही. सरकार २०११ ची जनगणना धरून डिलिमिटेशन करत आहे, असे सावंत यांनी सांगितले. शरद पवार यांच्याशी कोणी संपर्क करत आहे का, हे मला माहिती नाही. पण आमचे संबंध निश्चितपणे चांगले आहेत, असेही ते म्हणाले. सोमवारी अधिवेशन आहे. आणखी एखादी बैठक होऊ शकते. यातून पुढे आणखी काय कळेल. आमचा विधेयकाला १०० टक्के विरोध आहे. इंडिया आघाडी म्हणून आम्ही सोबत आहोत, असेही अरविंद सावंत यांनी सांगितले.
प्रतिक्रिया व्यक्त करा