, २९ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

राजू शेट्टी: पवारांची भूमिका मला पटलेली नाही

डिलिमिटेशन विधेयकावर शरद पवारांनी घेतलेली भूमिका मला पटलेली नाही, असे शेट्टी म्हणाले. मित्रपक्षांना विश्वासात घ्यायला हवे होते, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

राजू शेट्टी: पवारांची भूमिका मला पटलेली नाही

मतदारसंघ पुनर्रचना म्हणजेच डिलिमिटेशन विधेयकाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकारणात घडामोडींना वेग आला आहे. या विधेयकावर शरद पवार यांनी घेतलेली भूमिका माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पटलेली नाही, अशी स्पष्ट भावना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी व्यक्त केली आहे. राज्यसभेची जागा त्यांना देताना आपण पाठिंबा दिला होता, असेही शेट्टी म्हणाले. ठाकरे यांच्या शिवसेनेनेही त्यांच्या ज्येष्ठत्वाला मान देऊन पाठिंबा दिला होता. संख्याबळ नसतानाही शरद पवारांना राज्यसभेमध्ये जाण्यात यश आले. अशा परिस्थितीत किमान असा निर्णय घेताना मित्रपक्षांना तरी विश्वासात घ्यायला पाहिजे होते, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

माझ्यासारख्याने त्यांना सल्ला द्यावा अशी परिस्थिती नाही, पण हा निर्णय स्वतः त्यांनी घेतला आहे की त्यांच्या प्रकृतीचा फायदा घेऊन इतर कोणी घेतला आहे, हे मला माहिती नाही, असे शेट्टी म्हणाले. तो निर्णय पक्षातल्या अनेकांना रुजलेला नाही, असेही त्यांनी सांगितले. त्यांचे स्वतःचे आठ खासदार जर तिकडे जायला लागले तर ते चुकीचे आहे, असेही शेट्टी म्हणाले. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी जो आरोप केला आहे तो शरद पवारांचा इतिहास आहेच, असे म्हणत वडेट्टीवारांच्या आरोपांवरूनही शेट्टी यांनी डिवचले.

दादांच्या बाबतीत तो अनुभव होताच

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी जो आरोप केला आहे तो शरद पवारांचा इतिहास आहेच. दादांच्या बाबतीत तो अनुभव होताच, असे राजू शेट्टी म्हणाले. जुना इतिहास उगळण्यात फारसे स्वारस्य नाही. मात्र हा घेतलेला निर्णय मला पटलेला नाही. राष्ट्रवादीमध्ये दोन मतप्रवाह झालेले आहेतच. त्यांच्या पक्षातील अनेकांना हा निर्णय पटलेला नाही. भविष्यात त्याचे पडसाद उमटतीलच, असेही शेट्टी म्हणाले.

जनतेच्या मनातील बिल पास होईल का?

जितेंद्र आव्हाड यांनी पक्षाची भूमिका मांडताना वैचारिक तडजोड केलेली दिसते. हे मला अजिबात पटलेले नाही, असे शेट्टी म्हणाले. डिलिमिटेशनच्या मुद्द्यावरून संपूर्ण देशातील विरोधी पक्ष एकवटलेला आहे. मोदी-शाह यांनी कटकारस्तान करून पक्ष फोडले, गलिच्छ राजकारण त्यांनी केले, असा आरोप त्यांनी केला. मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मंजुरीसाठीचे बिल ते पास करून घेतील. मात्र जनतेच्या मनातील ते बिल पास होईल का? सर्वसामान्य लोकांची त्यांना मान्यता मिळेल का? असा सवालही शेट्टी यांनी केला. लोकसभेच्या खासदारांची संख्या वाढवून २०२९ ला सत्ता काबीज करायचे हे तुमचे दिवसाचे स्वप्न ठरणार आहे. ही वाढलेली संख्या तुमच्या उरावर बसणार आहे, असा इशाराही त्यांनी दिला.

अभी जाधव

Similar Posts

View All

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance