हिंदी चित्रपटांइतकीच त्यातील गाणीही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. अनेक गाणी चित्रपट प्रदर्शित होऊन वर्षे उलटली तरी आजही कानावर पडताच पाय थिरकायला लागतात. असंच एक गाणं म्हणजे ‘दिल धडकने दो’ चित्रपटातील ‘गल्लां गुडियां’. रणवीर सिंह, अनिल कपूर आणि फरहान अख्तर यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं आजही लग्नांमध्ये हमखास वाजवलं जातं. पण या गाण्याबद्दल एक रंजक गोष्ट अशी आहे की, हे गाणं फक्त पाच मिनिटांत शूट झालं होतं.
एकाच टेकमध्ये चित्रीकरण
झोया अख्तर दिग्दर्शित ‘दिल धडकने दो’ हा चित्रपट २०१५ मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटात रणवीर सिंह, अनिल कपूर, फरहान अख्तर, प्रियंका चोप्रा आणि अनुष्का शर्मा यांच्या प्रमुख भूमिका होत्या. ‘गल्लां गुडियां’ हे गाणं त्याच्या मजेशीर आणि उत्साही संगीतामुळे खूप लोकप्रिय झालं. इतर गाण्यांप्रमाणे या गाण्याच्या चित्रीकरणाला अनेक दिवस लागले नाहीत. हे गाणं फक्त पाच मिनिटांच्या एकाच टेकमध्ये चित्रित करण्यात आलं. विशेष म्हणजे यासाठी १०० हून अधिक बॅकडान्सर आणि चित्रपटाच्या निर्मिती टीमच्या सदस्यांना एकाच वेळी सांभाळावं लागलं. इतक्या लोकांमध्ये कट न करता गाण्याचं चित्रीकरण करणं हे एक मोठं आव्हान होतं.
रेकॉर्डिंगदरम्यानचा रंजक प्रसंग
या गाण्याबद्दल आणखी एक रंजक गोष्ट म्हणजे, संगीतकार एहसान नूरानी यांना ही कल्पना सुचली होती. त्यांना गाण्याची ही चाल विसरायची नव्हती, म्हणून त्यांनी ती लगेचच आपल्या फोनवर रेकॉर्ड केली. हे गाणं सुखविंदर सिंह, शंकर महादेवन, फरहान अख्तर, मनीष जे. टिपू आणि यशिता शर्मा यांनी गायलं आहे. गाण्याच्या रेकॉर्डिंगदरम्यान एका स्त्री आवाजाची गरज होती. स्टुडिओमध्ये उपस्थित असलेल्या यशिता शर्माच्या आईने त्या वेळी एक ओळ रेकॉर्ड केली.
प्रतिक्रिया व्यक्त करा