मराठी चित्रपट ‘गोंधळ’ची ऑस्करच्या सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट विभागासाठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड झाल्यानंतर चित्रपटसृष्टीत मोठी चर्चा सुरू झाली. या निवडीवर बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी प्रश्न उपस्थित केले होते. भारताकडून ऑस्करसाठी चुकीच्या चित्रपटांची निवड होते, असे मत त्यांनी मांडले होते. त्यांच्या या वक्तव्यावर मराठी चित्रपटसृष्टीत नाराजी व्यक्त होत असताना अभिनेता अजय पुरकर यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली.
कश्यप यांनी काय म्हटले होते
कश्यप यांनी एका मुलाखतीत भारताच्या ऑस्कर निवड प्रक्रियेवर टीका केली होती. ‘द लंचबॉक्स’ आणि ‘ऑल वी इमॅजिन ॲज लाइट’ यांसारख्या चित्रपटांची ऑस्करसाठी निवड व्हायला हवी होती, असे त्यांचे म्हणणे होते. भारतात योग्य चित्रपटांची निवड होत नाही, तसेच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये चित्रपटाला आधी प्रसिद्धी मिळणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले होते. ‘गोंधळ’ चित्रपटाला आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये पुरेसे प्रदर्शन मिळाले आहे का, याबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले होते.
पुरकर यांची प्रतिक्रिया
पुरकर यांनी कश्यप यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली. मराठी चित्रपटाला ऑस्करसाठी अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड मिळाल्यानंतर त्यावर अशा प्रकारे टीका करणे योग्य नसल्याची भूमिका त्यांनी मांडली. ‘द मराठी फाऊंडर’ला दिलेल्या मुलाखतीत पुरकर म्हणाले की, चित्रपट कोणते दाखवायचे याचा विचार करायला पाहिजे, असे कश्यप म्हणाले. त्यांचे चित्रपट कान्स किंवा ऑस्करला जातातच. ऑस्करचे एवढे महत्त्व काय हेच आपल्याला कळत नाही, असे पुरकर म्हणाले. आपल्या लोकांनी आपले चित्रपट पाहिले, हीच आपल्यासाठी सगळ्यात मोठी गोष्ट आहे. चित्रपट आपण आपल्या लोकांसाठी बनवतो, ऑस्करवाल्यांसाठी नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
भारतीय परंपरा दाखवली की या लोकांच्या पोटात दुखते, कारण त्यांना वाईट चित्रपट बनवायची सवय आहे, असे पुरकर म्हणाले. हे आपण तोंडावर सांगतो आणि कॅमेऱ्यासमोरही सांगतो, असे त्यांनी नमूद केले. अशा लोकांचे बोलणे आपल्याला मान्य नाही, असे सांगत त्यांनी ‘गोंधळ’ची निवड झाल्याचा आपल्याला खूप अभिमान वाटतो, असे म्हटले.
संतोष दावखर लिखित आणि दिग्दर्शित ‘गोंधळ’ हा मराठी मानसशास्त्रीय थरारपट आहे. महाराष्ट्रातील पारंपरिक गोंधळ या लोककलेच्या पार्श्वभूमीवर चित्रपटाची कथा घडते. किशोर कदम, इशिता देशमुख, योगेश सोहोनी आणि सुरेश विश्वकर्मा यांसारखे कलाकार या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटाला ९९ व्या अकादमी पुरस्कारांच्या सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट विभागासाठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवडण्यात आले आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा