बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. ब्राझिलियन मॉडेल आणि अभिनेत्री लारिसा बोनेसी हिच्यासोबतच्या त्याच्या नात्याच्या चर्चा गेल्या काही वर्षांपासून सुरू आहेत. दोघांना अनेकदा एकत्र पाहिलं गेलं आहे. मात्र, या नात्याबद्दल दोघांनीही आतापर्यंत अधिकृतपणे काहीही सांगितलेलं नाही. अशातच लारिसानं खान कुटुंबासोबतच्या आपल्या नात्याबद्दल पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. तिच्या या वक्तव्यामुळे दोघांच्या नात्याबद्दलच्या चर्चांना नव्याने उधाण आलं आहे.
खान कुटुंब माझ्यासाठी कुटुंबासारखं
एका मुलाखतीत लारिसानं खान कुटुंबासोबतच्या नात्याबद्दल मनमोकळं बोलणं केलं. एखाद्या व्यक्तीच्या यशाचा आदर करणं, त्यांच्याकडून प्रेरणा घेणं आणि माणूस म्हणून त्यांचा सन्मान करणं, यातून एक वेगळंच नातं तयार होतं, असं तिनं सांगितलं. खान कुटुंब तिच्यासाठी कुटुंबासारखंच असल्याचंही तिनं म्हटलं. त्यांचा पाठिंबा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा असल्याचं तिनं नमूद केलं. मैत्री हीच सर्वात महत्त्वाची गोष्ट असून ती दीर्घकाळ टिकणारी असते, असंही तिचं म्हणणं आहे. आर्यनसोबतच्या नात्याबद्दल तिनं थेट काहीही सांगितलेलं नसलं, तरी तिच्या वक्तव्यावरून ती खान कुटुंबाच्या जवळ असल्याचं स्पष्ट होतं.
आर्यनच्या मेहनतीचं कौतुक
या मुलाखतीत लारिसानं आर्यनच्या स्वभावाचं आणि मेहनतीचंही कौतुक केलं. आर्यन खूप चांगला माणूस असून तो हुशार आणि मेहनती असल्याचं तिनं सांगितलं. अनेकजण म्हणतात की त्याच्याकडे सगळंच आहे, मात्र या गोष्टींचा त्याला फरक पडत नाही, असं तिचं म्हणणं आहे. त्याला स्वतःच्या स्वप्नांसाठी मेहनत करायची आहे. आपल्या भविष्यासाठी आणि ज्या गोष्टींवर त्याचा विश्वास आहे, त्यासाठी तो प्रयत्न करत असल्याचं तिनं सांगितलं. तो खूप मेहनती आणि आपल्या कामाबद्दल गंभीर असल्यामुळे तो नक्कीच यशस्वी होईल, असा विश्वासही तिनं व्यक्त केला.
प्रतिक्रिया व्यक्त करा