गोव्यात सुरू असलेल्या ५७ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मराठी चित्रपट ‘तू आहेस ना’चा गाला प्रीमियर पार पडला. साडेचारशेहून अधिक प्रेक्षकांनी खचाखच भरलेल्या सभागृहात हा चित्रपट पाहिला. प्रदर्शनादरम्यान भावूक क्षण, प्रेक्षकांची दाद आणि टाळ्यांचा कडकडाट यामुळे हा सोहळा संस्मरणीय ठरला.
लव फिल्म्सची ही दुसरी मराठी निर्मिती असून, चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन दिपक गावडे यांनी केले आहे. लव रंजन आणि अंकुर गर्ग यांनी निर्मिती केली आहे. गाला प्रीमियरला चित्रपटातील प्रमुख कलाकार सुप्रिया पिळगावकर आणि सिद्धार्थ बोडके यांच्यासह दिपक गावडे आणि अंकुर गर्ग उपस्थित होते.
## खचाखच भरलेल्या सभागृहात भावूक क्षण
चित्रपटाची कथा पुढे सरकत असताना त्यातील भावविश्व आणि कलाकारांच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श केला. सुप्रिया पिळगावकर आणि सिद्धार्थ बोडके यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखांमधील सहजता, संवेदनशीलता आणि बारकावे यांचे प्रेक्षकांनी विशेष कौतुक केले. त्यांच्या अभिनयाला सभागृहातून उत्स्फूर्त दाद मिळाली.
या अनुभवाबद्दल बोलताना सुप्रिया पिळगावकर यांनी सांगितले की, इफ्फीसाठी चित्रपटाची निवड होणे हे प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ आहे. या चित्रपटाकडे त्यांना आकर्षित करणारी गोष्ट म्हणजे त्यांचा एक अत्यंत वैयक्तिक अनुभव हेच चित्रपट स्वीकारण्यामागचे प्रमुख कारण ठरले. लव रंजन आणि अंकुर गर्ग या हिंदी चित्रपटसृष्टीतील दोन मुख्य प्रवाहातील निर्मात्यांनी मराठीतील इतक्या संवेदनशील कथेची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला, ही गोष्टही त्यांच्यासाठी प्रोत्साहन देणारी होती. दिपक यांनी केलेले कथाकथन, पटकथेतील ताकद आणि या कथेवर त्यांनी दाखवलेला विश्वास, या सगळ्यामुळेच त्या या चित्रपटाशी जोडल्या गेल्या.
सिद्धार्थ बोडके म्हणाले की, स्वतःची एक ओळख निर्माण करण्याच्या धडपडीत आपण नेमके कसे माणूस बनत जातो, हा एक महत्त्वाचा प्रश्न हा चित्रपट उपस्थित करतो. हा प्रवास खूप सुंदर राहिला आहे आणि ‘तू आहेस ना’चा प्रीमियर इफ्फीमध्ये झाला, याचा त्यांना मनापासून आनंद आणि अभिमान आहे. विशेषतः इथे येण्याची ही त्यांची पहिलीच वेळ आहे. या संधीसाठी त्यांनी लव रंजन, अंकुर गर्ग आणि दिपक यांचे मनापासून आभार मानले. सुप्रिया पिळगावकर यांच्यासोबत काम करणे आणि त्यांच्यासोबत अनेक भावभावना अनुभवणे हा त्यांच्यासाठी एक खास अनुभव होता. लहानपणापासूनच ते त्यांच्या कामाचे चाहते असल्यामुळे हा अनुभव आणखी विशेष ठरला.
## २०२७ मध्ये चित्रपटगृहात प्रदर्शित होणार
या खास सोहळ्याला सिद्धार्थचे कुटुंबीयही उपस्थित होते. चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर प्रत्यक्ष पाहण्याचा त्यांचा हा क्षण कुटुंबासाठीही अविस्मरणीय ठरला. खचाखच भरलेले सभागृह, प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर उमटलेले भाव आणि चित्रपट संपल्यानंतर झालेला टाळ्यांचा कडकडाट यामुळे ‘तू आहेस ना’च्या संपूर्ण टीमसाठी इफ्फीतील हा वर्ल्ड प्रीमियर विशेष ठरला. हा चित्रपट २०२७ मध्ये चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा