बाइक रोज चालवणे चांगले की आठवड्यातून काही दिवस ती बंद ठेवणे, याबाबत अनेक बाइकस्वारांच्या मनात शंका असते. दोन्ही पद्धतींचा बाइकच्या इंजिन, बॅटरी, टायर आणि मायलेजवर वेगवेगळा परिणाम होतो. त्यामुळे योग्य निर्णय घेण्यासाठी दोन्ही बाजू समजून घेणे महत्त्वाचे ठरते.
रोज बाइक चालवण्याचे फायदे
रोज बाइक चालवल्यास इंजिन सुरू राहते. त्यामुळे त्यातील ऑइल सर्व भागांपर्यंत पोहोचते. बाइक चालवल्याने बॅटरी चार्ज राहण्यासही मदत होते. नियमित वापरामुळे बाइकच्या इंजिनचा आवाज, स्टार्टिंग किंवा चालवताना जाणवणारे बदल लवकर लक्षात येतात. त्यामुळे एखादी अडचण सुरुवातीच्या टप्प्यातच ओळखता येते.
मात्र बाइक रोज चालवल्याने पेट्रोलचा खर्च वाढतो, कारण वापरानुसार पेट्रोल खर्च होत असते. बाइक वारंवार थोड्या अंतरासाठी चालवल्यास इंजिन पूर्ण गरम होण्याआधी बंद होऊ शकते. त्यामुळे इंधनाचा वापर तुलनेने जास्त होऊ शकतो. योग्य वेगाने बाइक चालवणे, वेळेवर सर्व्हिसिंग करणे आणि टायरमध्ये योग्य हवा ठेवणे यामुळे चांगले मायलेज मिळण्यास मदत होते.
बाइक बरेच दिवस बंद ठेवल्यास काय होते?
बाइक अनेक दिवस बंद ठेवल्यास इंजिनमधील ऑइल खाली साचते. पण इंजिन सुरू केल्यावर ते पुन्हा सर्व भागांमध्ये पसरते. बाइक दीर्घकाळ वापरली नाही तर पेट्रोल जुने होऊ शकते आणि काही परिस्थितीत बाइक सुरू होण्यास त्रास होऊ शकतो. बाइक बराच काळ उभी राहिल्यास इंजिन सुरू करताना सुरुवातीला थोडा जास्त वेळ लागू शकतो.
बाइक नियमित चालवल्याने टायर फिरत राहतात आणि एकाच जागेवर सतत भार पडत नाही. बाइक अनेक दिवस एकाच जागी उभी राहिल्यास टायरमधील हवा कमी होऊ शकते आणि एकाच भागावर भार पडत राहतो. ब्रेक नियमित वापरल्याने त्यांची कार्यक्षमता चांगली राहण्यास मदत होते.
बाइक बंद असतानाही बॅटरीमधील चार्ज हळूहळू कमी होत असतो. बाइक अनेक दिवस किंवा आठवडे न वापरल्यास बॅटरीचा चार्ज कमी होऊन बाइक सुरू होण्यास अडचण येऊ शकते. बॅटरी जुनी असेल किंवा तिची क्षमता कमी झाली असेल तर बाइक कमी दिवस बंद ठेवल्यानंतरही ती डाऊन होण्याची शक्यता असते.
बाइक जास्त दिवस वापरणार नसाल तर ती कोरड्या आणि सुरक्षित जागी पार्क करावी. बाइकचे टायर योग्य हवेत ठेवावेत आणि चेनला वेळोवेळी ल्युब्रिकेशन करावे. बाइक जास्त दिवस बंद ठेवणार असल्यास बॅटरीची स्थिती तपासावी आणि गरजेनुसार चार्जिंगची व्यवस्था करावी.
प्रतिक्रिया व्यक्त करा