साधारणपणे म्हैस म्हटली की डोळ्यांसमोर काळीकुट्ट, धिप्पाड शरीराची आणि मजबूत बांधा असलेली म्हैस येते. पण महाराष्ट्रातील एका म्हशीची गोष्टच निराळी आहे. ही म्हैस अवघी दोन फूट उंचीची आहे. तिचे नाव पिंकी असून तिची किंमत तब्बल एक कोटी रुपये असल्याचा दावा केला जात आहे. तिचा छोटा आकार पाहण्यासाठी राजस्थानच्या पुष्कर मेळ्यात लोकांची मोठी गर्दी जमली होती.
ठाण्याहून पुष्करपर्यंतचा प्रवास
राजस्थानच्या अजमेर जिल्ह्यात दरवर्षी पुष्कर पशुमेळा भरतो. या मेळ्यात मोठमोठे घोडे, सजवलेले उंट आणि वजनदार म्हशी पाहायला मिळतात. मात्र यंदा सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले ते पिंकीने. महाराष्ट्रातील ठाणे येथील पशुपालक सोहिल शकील यांनी या म्हशीला पुष्कर मेळ्यात आणले होते. त्यासाठी त्यांनी जवळपास ११०० किलोमीटरचा प्रवास केला. पिंकीची उंची फक्त दोन फूट असल्याचे सांगितले जात आहे. तिचा आकार पाहून मेळ्यात येणारे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच आश्चर्यचकित होत आहेत. अनेक जण तिच्यासोबत फोटो आणि व्हिडिओ काढण्यासाठी गर्दी करत आहेत.
जगातील सर्वात छोटी म्हैस?
पिंकीच्या शरीराची ठेवण पाहून अनेकांना ती एखाद्या खास लहान आकाराच्या जातीची म्हैस वाटू शकते. मात्र तिच्या मालकाच्या म्हणण्यानुसार, तिची कमी उंची ही कोणत्याही विशिष्ट जातीमुळे नाही; तिच्या शरीराची वाढ नैसर्गिकरित्या इतर म्हशींसारखी झालेली नाही. तिच्या आईची उंचीही साधारण तीन फूट होती. पिंकी ही पूर्णपणे प्रौढ आहे, पण तिने कोणत्याही पिल्लाला जन्म दिलेला नाही, अशी माहिती तिच्या मालकाने दिली. पिंकी ही जगातील सर्वात छोटी म्हैस असल्याचाही दावा केला जात आहे. मात्र गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड किंवा कोणत्याही अधिकृत संस्थेने अद्याप या दाव्याला मान्यता दिलेली नाही. त्यामुळे सध्या पिंकीची दोन फूट उंची आणि तिच्या अनोख्या रूपामुळेच तिची चर्चा रंगली आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा