परदेशात जाऊन मोठ्या विद्यापीठात शिकण्याचं स्वप्न अनेक भारतीय विद्यार्थी पाहतात. मात्र तिथे गेल्यावर काहींना अशा प्रसंगांना तोंड द्यावं लागतं, ज्याची त्यांनी कल्पनाही केलेली नसते. ऑक्सफर्ड विद्यापीठात पीएचडीचं शिक्षण घेणाऱ्या कामाक्षी या भारतीय विद्यार्थिनीला ब्रिटनमधील एका दुकानात असाच वाईट अनुभव आला. खरेदी करत असताना एका अनोळखी महिलेने तिच्या शरीराच्या वासावरून अपमानास्पद टिप्पणी केली. कामाक्षीने हा अनुभव सोशल मीडियावर व्हिडिओद्वारे शेअर केला आहे.
दुकानातील प्रसंग नेमका काय घडला
कामाक्षीने २१ नोव्हेंबर रोजी इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर केला. ती एका दुकानात आनंदाने खरेदी करत होती. त्याचवेळी एक गोरी महिला वारंवार तिच्या आसपास फिरत होती. ती महिला असं का वागत आहे, हे कामाक्षीला काही वेळ कळलंच नाही. मात्र तिने त्या महिलेला काहीही न बोलता आपली खरेदी सुरू ठेवली. काही वेळाने ती महिला थेट कामाक्षीजवळ आली आणि म्हणाली की, मला हे सांगायचं नव्हतं, पण सांगावंच लागेल, तुझ्या अंगातून खूप, खूप घाणेरडा वास येतोय. हे ऐकताच कामाक्षी पूर्णपणे गोंधळून गेली. तिला काय बोलावं हेच सुचलं नाही. ती महिला बोलून लगेच तिथून निघून गेली, त्यामुळे कामाक्षीला उत्तर देण्याचीही संधी मिळाली नाही.
या घटनेमुळे कामाक्षीला खूप वाईट वाटलं. विशेष म्हणजे त्या दिवशी तिने आपल्या वडिलांचा आवडता परफ्यूम लावला होता. त्यामुळे त्या महिलेची टिप्पणी तिच्या मनाला खूप लागली. या प्रसंगानंतर संपूर्ण दिवस ती अस्वस्थ होती. लोकांचं आपल्याकडे लक्ष जाऊ नये, यासाठी ती स्वतःला झाकण्याचा आणि लपण्याचा प्रयत्न करत होती, असं तिने सांगितलं.
ओळख सोडणार नाही, ठाम भूमिका
कामाक्षीच्या मते, ब्रिटनमध्ये राहताना तिला अशा सूक्ष्म भेदभावाच्या अनेक अनुभवांना सामोरं जावं लागलं आहे. हा एकच प्रसंग नसल्याचं तिने स्पष्ट केलं. मात्र या अनुभवामुळे ती आपली ओळख, आवड आणि संस्कृती सोडणार नसल्याचं तिने ठामपणे सांगितलं. कामाक्षीचा व्हिडिओ समोर आल्यानंतर अनेकांनी तिच्या अनुभवाबद्दल सहवेदना व्यक्त केल्या. काही भारतीयांनी परदेशात त्यांनाही अशाच प्रकारच्या भेदभावाचा सामना करावा लागल्याचे अनुभव सांगितले. एका अनोळखी व्यक्तीच्या टिप्पणीमुळे स्वतःची ओळख बदलण्याची गरज नाही, अशा शब्दांत अनेकांनी तिला प्रोत्साहन दिलं.
प्रतिक्रिया व्यक्त करा