उत्तर प्रदेशातील हाथरस येथे गुरुवारी रात्री भीषण रस्ते अपघात झाला. आग्रा-अलिगढ महामार्गावर भरधाव वेगाने येणाऱ्या लोडरने टेम्पोला जोरदार धडक दिली. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत.
मृतांमध्ये १५ वर्षीय क्रिकेटपटू अश्विनी कुशवाहा यांचा समावेश आहे. दिल्लीतील जहांगीरपुरी येथे राहणारे ओंकार (५० वर्षे) आणि त्यांच्या पत्नी विनीता (३५ वर्षे) यांचाही या अपघातात मृत्यू झाला. जखमींमध्ये या दाम्पत्याची दोन मुले असून सर्व जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर अलिगढ मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत.
लग्नासाठी निघालेले कुटुंब
ओंकार हे पत्नी विनीता, १८ वर्षीय मुलगी प्रियांका आणि ११ वर्षीय मुलगा लक्ष्य यांच्यासह गुरुवारी अलिगढला आले होते. ते भाच्याच्या लग्नासाठी जात होते. अलिगढवरून ते सर्वजण टेम्पोत बसून हाथरसच्या दिशेने निघाले. वाटेत इतर प्रवासीही या टेम्पोत बसले. या टेम्पोतून एकूण सात जण प्रवास करत होते.
ढाब्याजवळ लोडरची समोरून धडक
सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास आग्रा-अलिगढ महामार्गावरील नागला भुरा गावाजवळील राधिका ढाब्याजवळ हा अपघात झाला. हाथरसच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या लोडरने टेम्पोला समोरून धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की टेम्पोच्या पुढील भागाचा चुराडा झाला आणि टेम्पोतील प्रवासी बाहेर फेकले गेले. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. टेम्पोत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढून जखमींना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले. मृत्यू झालेल्या चौघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.
प्रतिक्रिया व्यक्त करा