‘मैने प्यार किया’ या चित्रपटाने सलमान खानला रातोरात स्टार बनवले. मात्र या चित्रपटातील प्रेमची भूमिका सलमानच्या आधी अभिनेता आणि लेखक पीयूष मिश्रा यांना ऑफर करण्यात आल्याची चर्चा अनेक वर्षांपासून सुरू होती. सलमानने पीयूष यांना चित्रपटातून रिप्लेस केल्याचीही चर्चा रंगली होती. आता जवळपास ४० वर्षांनंतर पीयूष मिश्रा यांनी या जुन्या चर्चेवर स्पष्ट भूमिका मांडली आहे.
सलमानबद्दल कधीच अडचण नव्हती
पीयूष मिश्रा एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी सूत्रसंचालकांनी त्यांना सलमान खानच्या नावावरून काही अडचण आहे का, असा प्रश्न विचारला. त्यावर पीयूष यांनी अतिशय स्पष्टपणे उत्तर दिले. त्यांनी सांगितले की सलमानबद्दल त्यांना कधीच कोणतीही अडचण नव्हती आणि कोणाकडूनही त्यांना त्रास होत नाही. सलमान हा उत्तम स्टार असून तो चांगले पैसे कमावतो, असेही ते म्हणाले. ४० वर्षांपूर्वी जे काही घडले, त्याचे आपल्याला तसूभरही वाईट वाटले नव्हते, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यानंतरही आपण अनेक कामे केली, असे त्यांनी सांगितले. हा एक छोटासा प्रसंग होता, मात्र प्रसारमाध्यमांनी त्याला गरजेपेक्षा जास्त मोठे केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आपल्या आत्मचरित्रात्मक पुस्तकातही सलमानचा उल्लेख योग्य त्या संदर्भात केल्याचे त्यांनी सांगितले.
भूमिका कशी बदलली?
१९८९ मध्ये प्रदर्शित झालेला ‘मैने प्यार किया’ हा सूरज बडजात्या दिग्दर्शित चित्रपट हिंदी सिनेसृष्टीतील गाजलेल्या रोमँटिक चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटात सलमान खानने प्रेमची भूमिका साकारली होती. या भूमिकेमुळे त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली. मात्र या भूमिकेसाठी सुरुवातीला पीयूष मिश्रा यांचाही विचार करण्यात आला होता. त्यावेळी पीयूष हे नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये शिक्षण घेत होते. चित्रपट निर्माते राजकुमार बडजात्या यांनी त्यांची भेट घेतली होती आणि चित्रपटासाठी मुंबईत येण्यास सांगितले होते. मात्र पीयूष त्या वेळी मुंबईला गेले नाहीत. त्यांच्या मनात काही कारणांमुळे नाराजी होती आणि त्यांना जगाबद्दलही नकारात्मक भावना निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे त्यांनी ही संधी पुढे नेली नाही. काही वर्षांनी ते मुंबईत आले, तेव्हा ‘मैने प्यार किया’मध्ये सलमान खानची निवड झाली होती. चित्रपटाच्या यशानंतर सलमान रातोरात लोकप्रिय झाला. पीयूष मिश्रा यांनी यापूर्वीही स्पष्ट केले होते की, सलमानने त्यांना चित्रपटातून रिप्लेस केले नव्हते. सुरुवातीच्या टप्प्यावर केवळ त्यांच्या नावाचा विचार झाला होता. त्यामुळे या घटनेला ‘भूमिका हिरावून घेतली’ असे म्हणणे चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले होते.
प्रतिक्रिया व्यक्त करा