लग्नसमारंभ, कार्यालय किंवा एखाद्या खास पार्टीत महिला सिल्कच्या साड्या नेसतात. सिल्कच्या साड्यांमध्ये बनारसी आणि रेशमी सिल्कच्या साड्या असतात. या साड्यांवर जरी वर्क, बारीक डिझाईन किंवा मोती-मणी असतात, त्यामुळे त्या धुताना विशेष काळजी घ्यावी लागते.
आधी तपासणी, मगच धुणे
सिल्क साडी धुण्यापूर्वी ती शुद्ध रेशमी किंवा बनारसी आहे का, त्यावर जरी वर्क, बारीक डिझाईन किंवा मोती आहेत का आणि रंग जाण्याची भीती आहे का, याची तपासणी करावी. रंग जाण्याची शक्यता असेल किंवा नाजूक काम असेल तर साडी ड्राय क्लीन करणे महत्त्वाचे आहे. सिल्कच्या साड्या ड्राय क्लीन करणे योग्य असते. मात्र साडीच्या लेबलवर हाताने धुण्याची परवानगी असेल आणि साडीला केवळ हलका मळ लागला असेल, तर घरच्या घरीही ती धुता येते.
घरी धुण्याची योग्य पद्धत
साडी धुण्यासाठी एका टबमध्ये थंड पाणी घेऊन त्यात सिल्क साडी क्लीनर मिसळावे. साडी पाण्यात ठेवून हळुवारपणे स्वच्छ करावी. पाण्यात जास्त जोरात चोळू नये आणि जास्त वेळ भिजत ठेवू नये. साडीवरचे अतिरिक्त पाणी काढण्यासाठी ती स्वच्छ टॉवेलवर ठेवून हलक्या हाताने पिळून घ्यावी.
जरी, सिक्वेन्स, मणी किंवा हातकाम केलेल्या साड्या वॉशिंग मशीनमध्ये धुतल्यास नुकसान होऊ शकते. मशीनमध्ये धुतल्याने रंग किंवा धागे निघू शकतात, त्यामुळे अशा साड्या ड्राय क्लीनमध्ये द्याव्यात. साडी धुतल्यानंतर वाळत घालताना थेट उन्हात घालू नये, कारण त्यामुळे रंग उडण्याची शक्यता असते. साडी पूर्णपणे सुकल्यानंतर ती मलमल किंवा सुती कापडात ठेवावी.
प्रतिक्रिया व्यक्त करा