बदलती जीवनशैली, ताणतणाव आणि चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे उच्च रक्तदाबाचा त्रास अनेकांना जाणवतो. रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी फक्त औषधांवर अवलंबून न राहता रोजच्या सवयींमध्ये बदल करणेही तितकेच गरजेचे आहे. त्यासाठी कोणताही खर्च न लागणारा आणि सोपा पर्याय म्हणजे रोज पळणे. पण, पळण्याने खरोखरच रक्तदाब नियंत्रणात राहतो का? आठवड्यातून किती वेळ पळायला हवे? याबद्दल तज्ज्ञ काय सांगतात, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.
धावण्याने रक्तदाब कसा नियंत्रणात राहतो?
नियमित धावण्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यास कशी मदत होते, याबाबत केआयएमएस हॉस्पिटल्स, महादेवापुरा येथील इंटर्नल मेडिसिनचे प्रमुख प्रा. डॉ. एस. एम. फयाज यांनी माहिती दिली आहे. धावणे ही हृदयाच्या आरोग्यासाठी अत्यंत चांगली सवय असल्याचे ते म्हणाले. शांत बसलेले असतानाही हृदय एका ठोक्यात जास्त रक्त पंप करू शकते, ज्यामुळे हृदयावरचा ताण कमी होतो. धावताना रक्तवाहिन्यांच्या भिंतींतून नायट्रिक ऑक्साईड नावाचा वायू तयार होतो. त्यामुळे रक्तवाहिन्या रुंद होतात आणि रक्ताचा दाब कमी होतो. व्यायामामुळे शरीरातील ताण-तणावाची प्रतिक्रिया कमी होते आणि रक्तवाहिन्या ताठ न राहता मोकळ्या राहतात. वजन कमी राहिल्यास हृदयावर पडणारा अतिरिक्त भारही कमी होतो. धावताना रक्तदाब क्षणिक वाढणे स्वाभाविक आहे, पण त्यानंतर काही तासांसाठी रक्तदाबाची पातळी खाली येऊन आराम मिळतो.
रक्तदाबात ४ ते ५ mmHg इतकी जरी घट झाली तरी ती थोडी वाटू शकते. पण मोठ्या प्रमाणावर विचार केल्यास यामुळे हृदयविकाराचा झटका अथवा स्ट्रोक येण्याचा धोका खूप कमी होतो, असे प्रा. डॉ. फयाज यांनी सांगितले. ‘ब्रिटिश जर्नल ऑफ स्पोर्ट्स मेडिसिन’मध्ये २०२३ मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका मोठ्या अभ्यासात १५ हजार ८२७ लोकांच्या २७० चाचण्यांचा अभ्यास करण्यात आला. यातून धावण्यासारख्या व्यायामामुळे रक्तदाबाचा वरचा आकडा सरासरी ४.४९ mmHg ने आणि खालचा आकडा २.५३ mmHg ने कमी होतो, असे दिसून आले. तर स्नायूंवर ताण देऊन करायच्या व्यायामामुळे, उदाहरणार्थ भिंतीला टेकून बसणे, वरचा रक्तदाब सरासरी ८.२४ mmHg ने आणि खालचा रक्तदाब ४.०० mmHg ने कमी झाल्याचे दिसून आले.
आठवड्यातून किती धावावं?
आठवड्यातून जवळपास १५० मिनिटे मध्यम स्वरूपाचा व्यायाम करण्याचे ठरवा, असे प्रा. फयाज यांनी सांगितले आहे. अशा गतीने धावा की तुम्ही छोटी वाक्ये बोलू शकाल. आठवड्यातून ५ दिवस ३० मिनिटे धावा. धावण्याची इच्छा नसेल तर जलद गतीने चालण्यास सुरुवात करा आणि मध्ये मध्ये थोडा वेळ जॉगिंग करा. जलद चालणे आणि सायकलिंग करणे देखील फायदेशीर आहे. आठवड्यातून दोनदा स्ट्रेंथ ट्रेनिंगचाही समावेश करा. सुरक्षितपणे धावण्यासाठी डॉक्टरांशी बोलल्याशिवाय औषधे घेणे थांबवू नका किंवा कमी करू नका, ही सर्वात महत्त्वाची सूचना प्रा. फयाज यांनी दिली आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा