व्हॉट्सॲपचे जगभरात असंख्य युजर्स आहेत. भारतातही व्हॉट्सॲपचे युजर्स मोठ्या प्रमाणावर आहेत. सकाळी उठल्यापासून सायंकाळी झोपेपर्यंत व्हॉट्सॲपचा दैनंदिन आयुष्यात मोठ्या प्रमाणात वापर होतो. ऑफिसची कामे असोत किंवा मित्रांशी गप्पा मारणं असो, आपण व्हॉट्सॲपचा वापर वारंवार करतो. मात्र आता व्हॉट्सॲप युजर्ससाठी एक धोक्याची घंटा वाजली आहे. सरकारच्या सायबर सुरक्षा एजन्सी CERT-In ने व्हॉट्सॲपमधील अनेक त्रुटींबाबत एक नवीन इशारा जारी केला आहे. हा धोका केवळ मोबाईल युजर्सपुरता मर्यादित नाही. संगणक आणि लॅपटॉपवर व्हॉट्सॲप वापरणारे देखील असुरक्षित असू शकतात.
कोणत्या व्हर्जनमध्ये त्रुटी आढळल्या
CERT-In ने २६ नोव्हेंबर रोजी एक सूचना जारी केली. त्यात म्हटलं आहे की, व्हॉट्सॲपच्या विविध व्हर्जनमध्ये काही तांत्रिक त्रुटी आढळून आल्या आहेत, ज्यांचा सायबर हॅकर्सकडून गैरफायदा घेतला जाऊ शकतो. या त्रुटींमुळे हॅकर्सना युजर्सच्या पर्सनल डेटामध्ये प्रवेश मिळण्याची शक्यता आहे. इतकंच नाही, तर हॅकर्स डिव्हाइसवर दुर्भावनापूर्ण कोड चालवून अॅपच्या काही सुरक्षा निर्बंधांनाही बायपास करू शकतात. CERT-In चा इशारा अँड्रॉइड, आयओएस, मॅक आणि विंडोजवरील व्हॉट्सॲप युजर्सना लागू होतो. यामध्ये व्हॉट्सॲप बिझनेस वापरकर्त्यांचाही समावेश आहे. सरकारी संस्थेनुसार अँड्रॉइडवरील व्हॉट्सॲपचे 2.26.35.74 आणि 2.26.17.4 पेक्षा जुने व्हर्जन, आयफोनवरील व्हॉट्सॲपचे 2.26.24.72 आणि 2.26.15.72 पेक्षा जुने व्हर्जन, विंडोजवरील व्हॉट्सॲपचे 2.3000.1032164386.258709 पेक्षा जुने व्हर्जन आणि मॅक डेस्कटॉपवरील व्हॉट्सॲपचे 2.26.23.72 पेक्षा जुने व्हर्जन यामध्ये त्रुटी आढळल्या आहेत. याव्यतिरिक्त, अँड्रॉइड आणि आयओएसवरील व्हॉट्सॲप बिझनेस वापरकर्त्यांनीही सावधगिरी बाळगली पाहिजे.
काही दिवसांपूर्वी गृह मंत्रालयाने वापरकर्त्यांना व्हॉट्सॲप वेब न वापरण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर आता CERT-In चा हा इशारा आला आहे.
धोक्यापासून बचाव कसा करावा
या व्हॉट्सॲप धोक्यापासून संरक्षण करण्यासाठी CERT-In ने युजर्सना आणि संस्थांना व्हॉट्सॲपसाठी नवीनतम सुरक्षा अपडेट स्थापित करण्याचा सल्ला दिला आहे. अँड्रॉइड युजर्सनी गूगल प्ले स्टोअरवर अपडेट्स तपासावेत आणि आयफोन युजर्सनी अॅपल अॅप स्टोअरवर अपडेट्स तपासावेत. जे संगणक आणि लॅपटॉपवर व्हॉट्सॲप वापरतात, त्यांनी देखील अपडेटेड व्हर्जन वापरावं. त्यामुळे अॅप वेळोवेळी अपडेट ठेवणं हाच या धोक्यापासून बचावाचा सोपा मार्ग आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा