बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या तिच्या आगामी ‘ईठा’ या सिनेमामुळे सर्वत्र चर्चेत आहे. या सिनेमाबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली असून, भोजपुरी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री अक्षरा सिंह हिची या सिनेमात एन्ट्री झाली आहे. अक्षरा सिंहने स्वतः सोशल मीडियावर श्रद्धा कपूरसोबतचे काही फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. त्यामुळे सिनेमाविषयी प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. अक्षरा सिंहने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या. गेल्या अनेक दिवसांपासून ही गोष्ट मनात ठेवली होती. मात्र आता अखेर ही आनंदाची बातमी सांगू शकते की, ‘ईठा’ हा सिनेमा ४ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे, असं तिने म्हटलं आहे.
भूमिकेबाबत गुलदस्ता कायम
या सिनेमाच्या निमित्ताने अक्षरा सिंहला श्रद्धा कपूरसोबत स्क्रीन शेअर करण्याची संधी मिळाली आहे. श्रद्धा ही एक उत्तम अभिनेत्री असून तिच्यासोबत काम करताना तिला जवळून जाणून घेण्याची संधी मिळाली, असं अक्षराने सांगितलं. मात्र सिनेमातील आपल्या भूमिकेबाबत तिने अद्याप कोणताही खुलासा केलेला नाही. त्यामुळे तिची भूमिका नेमकी काय असणार, याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.
दरम्यान, लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘ईठा’ हा सिनेमा महाराष्ट्राच्या समृद्ध तमाशा आणि लावणी परंपरेवर आधारित आहे. या सिनेमात श्रद्धा कपूर तमाशा कलावंत विठाबाई नारायणगावकर यांच्यापासून प्रेरित भूमिका साकारत आहे. तसेच अभिनेता रणदीप हुड्डा याच्यासह अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. त्यामुळे या चित्रपटाकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.
४ डिसेंबरला दोन सिनेमांची टक्कर
सलमान खान सध्या ‘मातृभूमी’ सिनेमामुळे चर्चेत आहे. हा सिनेमा ४ डिसेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. तर ४ डिसेंबर रोजीच श्रद्धा कपूर स्टारर ‘ईठा’ सिनेमा देखील प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे ‘मातृभूमी’ आणि ‘ईठा’ हे दोन सिनेमे एकाच दिवशी आमने-सामने येणार आहेत. त्यामुळे कोणता सिनेमा बॉक्स ऑफिसवर बाजी मारेल, हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा