महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसमध्ये मोठा संघटनात्मक निर्णय घेण्यात आला आहे. प्रदेशातील विविध पदाधिकाऱ्यांची जिल्हा प्रभारी आणि सहप्रभारी म्हणून असलेली जबाबदारी तात्काळ प्रभावाने स्थगित करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसकडून महत्त्वपूर्ण संघटनात्मक आदेश जारी करण्यात आला आहे. या आदेशानुसार, पुढील आदेश येईपर्यंत ही स्थगिती कायम राहणार आहे.
कोणत्या पदाधिकाऱ्यांवर परिणाम?
या आदेशानुसार, पुढील आदेश येईपर्यंत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसमधील उपाध्यक्षांच्या झोनल इन्चार्ज प्रभारी, संघटन महासचिव प्रभारी, लीगल टीम, मीडिया टीम आणि सोशल मीडिया टीम, कोषाध्यक्ष तसेच प्रशासकीय महासचिव प्रभारी यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांची जिल्हा प्रभारी आणि सहप्रभारी म्हणून असलेली जबाबदारी स्थगित करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या संघटनात्मक कामकाजात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या विविध विभागांच्या पदाधिकाऱ्यांचा या निर्णयात समावेश आहे. जिल्हा स्तरावरील संघटनात्मक कामकाजाची जबाबदारी सांभाळणाऱ्या प्रभारी आणि सहप्रभारी पदाधिकाऱ्यांना या निर्णयाचा थेट फटका बसणार आहे. प्रदेशातील संघटनात्मक रचना आणि जिल्हा स्तरावरील जबाबदाऱ्यांच्या संदर्भात हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
पुढे काय?
या निर्णयानंतर जिल्हा स्तरावरील संघटनात्मक जबाबदाऱ्यांमध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. आता काँग्रेसमध्ये जिल्हास्तरीय जबाबदाऱ्यांची नव्याने आखणी होण्याची शक्यता आहे. मात्र नव्या नियुक्त्यांबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. जबाबदाऱ्या स्थगित करण्यामागील नेमके कारण किंवा पुढील संघटनात्मक बदलांबाबत आदेशात कोणतीही स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही. या आदेशात सर्व संबंधित पदाधिकाऱ्यांनी निर्णयाचे पालन करावे, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. या आदेशावर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रभारी अजय चिकारा, प्रदेशाध्यक्ष शिवराज बापूसाहेब मोरे, सहप्रभारी नवज्योतसिंग संधू आणि सहप्रभारी शांभवी शुक्ला यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
प्रतिक्रिया व्यक्त करा