लग्नसराई आणि सणासुदीच्या दिवसांत घरात मिठाईचे बॉक्स येतात. अशा वेळी सकाळी नाश्त्याआधीच एखादा बर्फीचा तुकडा खाण्याचा मोह होतो, पण हे आरोग्यासाठी कितपत योग्य आहे? मुंबईतील एंडोक्राइनोलॉजिस्ट डॉ. डेव्हिड चँडी यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांच्या मते, गोड खाण्यावर पूर्ण बंदी घालण्यापेक्षा ते दुपारच्या संतुलित जेवणानंतर खाणे केव्हाही चांगले.
रिकाम्या पोटी गोड खाल्ल्याने काय होते?
सकाळी रिकाम्या पोटी मिठाई खाल्ल्यास रक्तातील साखर खूप लवकर वाढते. पोटात इतर कोणतेही अन्न नसल्यामुळे साखर थेट रक्तात शोषली जाते, ज्यामुळे मधुमेहींना मोठा त्रास होऊ शकतो. मिठाईमध्ये केवळ साखरच असते असे नाही; ती बनवण्यासाठी वापरलेला मैदा, रवा आणि दूध यांतूनही शरीराला भरपूर कर्बोदके मिळतात. त्यामुळे मिठाईचा तुकडा छोटा असला तरी साखरेवर परिणाम होतो. जेवणानंतर खाल्लेल्या मिठाईमुळे रक्तातील साखर एकदम न वाढता हळूहळू वाढते.
जेवणानंतर मिठाई खाणे का चांगले?
जेवणातील डाळी आणि कडधान्यांमधील फायबर पोटात एक प्रकारचे जेल तयार करतात, ज्यामुळे साखर हळू पचते. तसेच पनीर, दही, अंडी किंवा मासे यांतील प्रोटीन आणि फॅट्समुळे पोट लवकर रिकामे होत नाही. जेवताना सर्वात आधी भरपूर फायबर असलेल्या भाज्या आणि प्रोटीनयुक्त पदार्थ खावेत. त्यानंतर पोळी-भात आणि सर्वात शेवटी मिठाईचा छोटा तुकडा खाल्ल्यास रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते. तूप, खवा आणि काजू-बदाम यांतील स्निग्धांशामुळे पचन संथ होते आणि साखर थोड्या उशिरा वाढते. मात्र, त्यामुळे मिठाईतील साखर किंवा कॅलरीज अजिबात कमी होत नाहीत, हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. तूप आणि खवा असलेली जड मिठाई खाल्ल्यास रक्तातील साखर उशिरा वाढते. जे रुग्ण इन्सुलिन घेतात, त्यांच्यासाठी ही उशिरा वाढणारी साखर अडचणीची ठरू शकते. त्यामुळे जेवणात मिठाई खायची असेल, तर ताटातील भात किंवा पोळीचे प्रमाण थोडे कमी करावे; दोन्ही पूर्ण बंद करू नयेत. ताटात पालेभाज्या आणि डाळी नक्की ठेवाव्यात, जेणेकरून एकूण कर्बोदके संतुलित राहतील. संतुलित जेवणानंतर अगदी छोटा तुकडा मिठाई खाणे केव्हाही चांगले. पण ताटात आधीच भरपूर भात, पोळी किंवा बटाटा असेल, तर वरून गोड खाणे टाळावे. सणासुदीला कधीतरी आणि मर्यादित प्रमाणातच मिठाईचा आस्वाद घ्यावा.
प्रतिक्रिया व्यक्त करा