अभिनेत्री पूजा बत्रा यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांचे वडील, भारतीय लष्करातील निवृत्त अधिकारी कर्नल रवि बत्रा यांचे २० नोव्हेंबर रोजी निधन झाले. वडिलांच्या निधनाची माहिती पूजा यांनी सोशल मीडियावर भावूक पोस्ट शेअर करत दिली.
पूजा यांनी इन्स्टाग्रामवर वडिलांसोबतचे काही खास फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये कुटुंबीय आणि मित्रांसोबत घालवलेले आनंदाचे क्षण दिसत आहेत. वडिलांच्या आठवणींना उजाळा देताना त्यांनी लिहिले की, त्या रुग्णालयात पोहोचण्याआधीच वडिलांनी अखेरचा श्वास घेतला.
वडील हेच आयुष्याचा आधार
वडिलांच्या अचानक जाण्यावर अजूनही विश्वास बसत नसल्याचे पूजा यांनी म्हटले आहे. त्यांचा आवाज आजही कानात घुमतो आणि त्यांचे हसू कायम मनात राहील, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
वडील हेच आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा आधार होते आणि आपल्या जगाचा केंद्रबिंदू तेच होते, असे पूजा यांनी लिहिले. त्यांनी नेहमीच कुटुंबाची काळजी घेतली. त्यांच्या प्रेमळ स्वभावाची, विनोदबुद्धीची आणि दिलखुलास व्यक्तिमत्त्वाची आठवणही त्यांनी पोस्टमधून सांगितली.
वडिलांनी आईला दिलेला आदर, त्यांचे गाणे, प्रत्येक प्रसंगी आनंदी राहण्याची वृत्ती आणि दैनंदिन आयुष्यात दिलेले मार्गदर्शन कायम स्मरणात राहील, असे पूजा म्हणाल्या. हा आपल्या आयुष्यातील सर्वात कठीण आणि अंधकारमय काळ असल्याचेही त्यांनी नमूद केले.
दोन युद्धांत सहभागी झालेले अधिकारी
पूजा यांनी वडिलांच्या लष्करी कारकिर्दीचाही अभिमानाने उल्लेख केला. कर्नल रवि बत्रा यांनी दोन युद्धांमध्ये सहभाग घेतला होता आणि अभिमानाने देशाची सेवा केली होती. ते एक उत्तम अधिकारी आणि कुटुंबाची काळजी घेणारे वडील होते, अशा शब्दांत त्यांनी वडिलांना आदरांजली वाहिली.
पूजा बत्रा यांनी १९९३ मध्ये मिस इंडिया इंटरनॅशनलचा किताब जिंकल्यानंतर प्रसिद्धी मिळवली. १९९७ मध्ये अनिल कपूर यांच्यासोबतच्या ‘विरासत’ चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर ‘हसीना मान जाएगी’, ‘नायक : द रिअल हिरो’, ‘कहीं प्यार ना हो जाए’ यांसारख्या चित्रपटांत त्या दिसल्या. वडिलांच्या निधनामुळे अभिनेत्रीवर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला असून, चाहते आणि मनोरंजनविश्वातील अनेकजण तिला धीर देत आहेत.
प्रतिक्रिया व्यक्त करा