मुंबईतील धारावी पुनर्विकास प्रकल्पाविरोधात २८ नोव्हेंबर रोजी मोठे आंदोलन होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात हे धारावी बचाव आंदोलन आयोजित करण्यात आले असून, आमदार आदित्य ठाकरेही त्यात सहभागी होणार आहेत. सकाळी ११ वाजता धारावीत हे आंदोलन सुरू होईल.
या आंदोलनात मुंबईतील शिवसेनेचे सर्व आमदार, खासदार, नगरसेवक आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांना सहभागी होण्याचे पक्षाने निर्देश दिले आहेत. कुंभारवाडा येथून सुरू होणारा हा मोर्चा अदानी एक्सपिरियन्स सेंटरपर्यंत जाणार आहे.
धारावीकरांच्या प्रमुख मागण्या काय?
राज्य सरकारने धारावी पुनर्विकास प्रकल्पात ५०० चौरस फुटांची घरे देण्यास मंजुरी दिली आहे. मात्र धारावीकर ७५० चौरस फुटांच्या घरांची मागणी करत आहेत. याशिवाय प्रकल्पात काही कुटुंबांना अपात्र ठरवण्यात आले आहे; त्या कुटुंबांनाही पात्र करून घ्यावे, अशीही प्रमुख मागणी आंदोलनातून केली जाणार आहे.
यापूर्वीही आवाज उठवला
धारावी पुनर्विकास प्रकल्पाबाबत ठाकरेंच्या शिवसेनेने यापूर्वीही अनेकदा आवाज उठवला आहे. आता २८ नोव्हेंबरच्या आंदोलनातून या मागण्या पुन्हा एकदा जोरदारपणे मांडल्या जाणार आहेत.
प्रतिक्रिया व्यक्त करा