लातूर जिल्ह्यातील निटूर गावातील पाणीटंचाईने १९७२ च्या भयानक दुष्काळालाही मागे टाकले आहे. गावात सध्या कुठेच पाणी नाही. माणसांना प्यायला पाणी मिळत नाही, तर जनावरांना पाणी कुठून आणायचे, असा प्रश्न ग्रामस्थांसमोर उभा आहे.
तहानलेल्या जनावरांचे डोळ्यांदेखत होणारे हाल पाहून ग्रामस्थांचे काळीज तुटत आहे. घशाला कोरड पडली असताना जगण्याची आशाच मावळत चालल्याचे गावकरी सांगत आहेत. असेच राहिले तर आत्महत्या करण्याची वेळ येईल, असा आक्रोश त्यांनी व्यक्त केला आहे.
१९७२ मध्ये पाणी होते, अन्न नव्हते
गावकऱ्यांनी सांगितले की, १९७२ मध्ये दुष्काळ पडला होता. तेव्हा पाणी होते, पण खायला अन्न नव्हते. मात्र, यंदाच्या दुष्काळातील परिस्थिती त्यापेक्षाही गंभीर आहे. सध्या कुठेच पाणी नाही. माणसांना प्यायला पाणी नाही, तर जनावरांना पाणी कुठून आणायचे, असा त्यांचा प्रश्न आहे.
सरकारने पाणीपुरवठा करावा, अशी मागणी
गावकऱ्यांनी आपली व्यथा मांडताना सरकारने पाणीपुरवठा करावा, अशी मागणी केली आहे. पाणी नसल्यामुळे यावेळी जगणार कसे, हा प्रश्न त्यांना पडला आहे. गावाची ही परिस्थिती राज्यासमोर यावी, अशी त्यांची अपेक्षा आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा