राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्हा वगळता उर्वरित ३३ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना मोफत अन्नधान्य देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या निर्णयाचा थेट लाभ राज्यातील ४२ लाख ३० हजार ७८३ शेतकऱ्यांना मिळणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
माणशी ५ किलो धान्य — ३ किलो तांदूळ, २ किलो गहू
राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत राज्यातील ५ कोटी ७९ लाख ३४ हजार ७०२ लाभार्थ्यांना मोफत धान्य मिळते, तर १४ आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील २१ लाख ६० हजार ६८२ शेतकऱ्यांना दरमहा १७० रुपये दिले जातात. मात्र या दोन्ही योजनांचा लाभ न मिळणाऱ्या शेतकरी कुटुंबांचा विचार करून त्यांना पुढील तीन महिन्यांसाठी दरमहा माणशी ५ किलो मोफत धान्य दिले जाणार आहे. यामध्ये ३ किलो तांदूळ आणि २ किलो गहू यांचा समावेश असणार आहे. त्यानंतरच्या कालावधीसाठी परिस्थितीचा आढावा घेऊन योजना पुढे सुरू ठेवण्याबाबत निर्णय घेतला जाईल.
दुष्काळाच्या काळात शेतकरी कुटुंबांना अन्नधान्याची टंचाई भासू नये आणि त्यांना आधार मिळावा, या उद्देशाने शासनाने हे पाऊल उचलले आहे. या मोफत धान्य वितरणासाठी लागणारे अतिरिक्त नियतन केंद्र शासनाच्या ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाकडून मागणी करण्यासही बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.
ई-पॉस मशिनद्वारे बायोमेट्रिक पडताळणी
ज्या शिधापत्रिकाधारकांचे आधार सीडिंग पूर्ण झाले आहे, त्यांना ई-पॉस मशिनद्वारे बायोमेट्रिक पडताळणी करून धान्य वाटप करण्यात येणार आहे. ज्या लाभार्थ्यांचे आधार सीडिंग अद्याप बाकी आहे, त्यांचे आधार सीडिंग पूर्ण करून घेतल्यानंतरच त्यांना बायोमेट्रिक पडताळणीद्वारे हे मोफत धान्य दिले जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
मंत्रिमंडळ बैठकीत यासह एकूण १४ निर्णय घेण्यात आले. आर्थिक फसवणूक करणाऱ्यांची मालमत्ता जप्त करण्याचा निर्णयही त्यामध्ये समाविष्ट आहे. राज्यात सध्या अभूतपूर्व दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने हे पाऊल उचलल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
प्रतिक्रिया व्यक्त करा