राज्यात सध्या हवामानाचे दोन वेगळे रूप एकाच वेळी पाहायला मिळत आहे. सकाळी आणि रात्री थंडीचा कडाका जाणवत असताना दुपारच्या वेळी उकाडा वाढत आहे. तापमानात सतत चढउतार होत असल्याने अनेक भागांत वातावरणात मोठा बदल दिसून येत आहे. आज, २६ नोव्हेंबर रोजी राज्यातील कमाल आणि किमान तापमानात चढउतार राहण्याची शक्यता आहे. उत्तरेकडून थंड वारे राज्यात दाखल होत असले तरी तापमानातील अस्थिरता कायम आहे.
कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात कसे राहील हवामान?
मुंबई, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये आज कोरडे आणि उष्ण वातावरण राहण्याची शक्यता आहे. नाशिक, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये कमाल तापमानात वाढ होणार आहे. तर २७ नोव्हेंबर रोजी किमान तापमानात घट होण्याचा अंदाज आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर आणि पुणे या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने कोणताही इशारा दिलेला नाही. परभणी, लातूर, नांदेड, बीड, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव आणि जालना या जिल्ह्यांमध्ये उष्ण आणि कोरडे हवामान राहील.
विदर्भात थंडीचा जोर वाढणार
विदर्भात थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता आहे. तेथे तापमान १६ अंश ते २९ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. किमान तापमानात घट होऊन गारठा वाढू शकतो. राज्यात कधी गारठा तर कधी उकाडा अशी स्थिती तयार झाली असून भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला आहे. प्रशासनाकडून नागरिकांना हवामानातील बदल लक्षात घेऊन काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. येत्या दिवसांतही हवामानात असेच बदल होत राहण्याची शक्यता आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा