, २६ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

सातारा जिल्हा परिषदेलाच पाणीटंचाईचा फटका

सातारा जिल्हा परिषदेत १० ते १२ दिवसांपासून पाणीटंचाई आहे. रस्त्याच्या कामात जलवाहिनी फुटल्याने टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे; अधिकारी-कर्मचारी त्रस्त आहेत.

सातारा जिल्हा परिषदेलाच पाणीटंचाईचा फटका

जिल्ह्याचे मिनीमंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सातारा जिल्हा परिषदेला गेल्या १० ते १२ दिवसांपासून पाणीटंचाईचा फटका बसू लागला आहे. त्यामुळे नागरिक व कर्मचाऱ्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पाणीपुरवठ्याचे नियोजन करणाऱ्या यंत्रणेचीच पाण्यासाठी तडफड होऊ लागली आहे.

जलवाहिनी फुटल्याने ठणठणाट

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पाणीटंचाईवर उपाययोजना करण्याची जबाबदारी असलेल्या जिल्हा परिषद मुख्यालयालाच पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याचे चित्र समोर आले आहे. कार्यालयासह अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निवासस्थान परिसराला टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. पोवईनाका ते बॉम्बे रेस्टॉरंट दरम्यान रस्त्याचे काम सध्या बांधकाम विभागामार्फत सुरू आहे. या कामामुळे जलवाहिनी फुटली असून गेल्या १० ते १२ दिवसांपासून जिल्हा परिषदेत पाण्याचा ठणठणाट सुरू आहे.

तातडीच्या उपायांची गरज

जिल्हा परिषदेत दैनंदिन कामकाजासाठी नागरिकांसह अधिकारी व कर्मचाऱ्यांची वर्दळ असते. पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह आणि इतर दैनंदिन वापरासाठी पाण्याची आवश्यकता असते. मात्र पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने कर्मचाऱ्यांची गैरसोय होत आहे. विकतचे पाणी घेऊन जिल्हा परिषदेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना तहान भागवावी लागत आहे. मुख्य इमारतीसह विस्तारित इमारतीमध्ये पाण्याची ओरड सुरू असल्याने अधिकारी व कर्मचारी त्रस्त झाले आहेत. सर्वच विभागांत पाण्यासाठी कर्मचारी व नागरिकांची तडफड सुरू असून प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे.

विशाल राजपूत

Similar Posts

View All

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance