वाशिम जिल्ह्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या कार्यालयात चकरा माराव्या लागत आहेत. केंद्र सरकारच्या या योजनेचा लाभ मिळावा, यासाठी शेतकरी वारंवार कार्यालयात जात आहेत. जिल्ह्यातील सहाही तालुक्यांत — वाशिम, कारंजा, मंगरुळपीर, मानोरा, रिसोड आणि मालेगाव — अनेक शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या कार्यालयात जाऊन माहिती घ्यावी लागत आहे.
शासनाच्या निकषानुसार ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करूनही अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात योजनेचे पैसे जमा होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. कुणाचे दोन तर कुणाचे तीन हप्ते रखडल्याने शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा आणि शेतीच्या हंगामात बियाणे, खते तसेच इतर आवश्यक खर्चासाठी मदत व्हावी, या उद्देशाने केंद्र शासनाकडून ही योजना राबविण्यात येते.
यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह
काही लाभार्थ्यांना दोन हप्त्यांची तर काहींना तीन हप्त्यांची प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे शासनाकडून आर्थिक मदतीची अपेक्षा ठेवलेल्या शेतकऱ्यांची निराशा वाढत आहे. आधीच पिकांची देखभाल आणि बाजारपेठेतील अनिश्चितता अशा अनेक समस्यांशी झुंज देणाऱ्या शेतकऱ्यांना आता शासकीय योजनेचा लाभ मिळविण्यासाठीही हेलपाटे मारावे लागत आहेत. शासनाच्या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी पात्र शेतकऱ्यांना कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागत असतील, तर यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होणे स्वाभाविक आहे.
ई-केवायसी पूर्ण, पण हप्ते नाहीत
अनेक शेतकऱ्यांनी आधार लिंकिंग, ई-केवायसी आणि बँक खात्याशी संबंधित आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली आहे. तरीदेखील त्यांच्या खात्यात हप्त्याची रक्कम जमा झालेली नाही. काही शेतकऱ्यांच्या अर्जामध्ये तांत्रिक त्रुटी दाखविल्या जात आहेत, तर काहींच्या नोंदींमध्ये जमीन अभिलेख, आधार पडताळणी, बँक खाते किंवा लाभार्थी माहितीशी संबंधित अडचणी असल्याचे सांगितले जाते. शासनाकडून वारंवार ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन केले जाते. त्यानुसार शेतकऱ्यांनी आपली प्रक्रिया पूर्ण केली. मात्र, ई-केवायसी झाल्यानंतरही हप्ते जमा होत नसतील, तर या प्रक्रियेचा उपयोग काय, असा सवाल शेतकरी उपस्थित करीत आहेत. योजनेच्या लाभापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांची संख्या निश्चित करून त्यांच्या अर्जामधील त्रुटींची तपासणी करावी आणि हप्ते न मिळालेल्या लाभार्थ्यांना त्वरित लाभ मिळावा यासाठी शासनाने वेळीच कार्यवाही करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा