धाराशिव जिल्ह्यातील उपलब्ध पाणीसाठा वेगाने घटत असून तो आता ५.१४ टक्क्यांवर आला आहे. आगामी उन्हाळ्यातील पाणीटंचाई लक्षात घेऊन पुढील आठ महिन्यांचे काटेकोर नियोजन करावे, असे निर्देश पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. हे नियोजन केवळ कागदावर न ठेवता प्रत्येक कुटुंबापर्यंत पाणी पोहोचविण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांनी घ्यावी, असेही त्यांनी सांगितले. पाणीटंचाईवरील उपाययोजनांसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नसल्याची ग्वाही त्यांनी दिली.
धाराशिव जिल्ह्यातील पाणीटंचाईचा आढावा घेण्यासाठी बुधवारी, २५ तारखेला मंत्रालयात बैठक झाली. मागील महिन्यात सुमारे आठ टक्के असलेला पाणीसाठा आता ५.१४ टक्क्यांवर आल्याने आगामी काळातील संकट अधिक गंभीर होण्याची शक्यता बैठकीत व्यक्त करण्यात आली. त्यामुळे टंचाई निर्माण झाल्यानंतर टँकर सुरू करण्याची वाट पाहण्याऐवजी आधीच उपाययोजना कराव्यात, असे निर्देश देण्यात आले.
प्रत्येक गावात पाणी साठवण टाक्या उभारण्यावर भर
प्रत्येक गावात आवश्यकतेनुसार पाणी साठवण टाक्या उभाराव्यात, पर्यायी जलस्रोतांचा शोध घ्यावा आणि अस्तित्वातील पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती तातडीने करावी, असे निर्देश सरनाईक यांनी दिले. पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देतानाच शेतकऱ्यांच्या फळबागा वाचविण्यासाठी स्वतंत्र पाणी नियोजन करावे, अशी सूचनाही त्यांनी केली. नदी व तलावांतील गाळ काढण्याच्या कामांना गती देऊन हा गाळ जमीन खरडून गेलेल्या शेतकऱ्यांना प्राधान्याने द्यावा. स्वखर्चाने गाळ काढू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांसाठी परवानगीची प्रक्रिया सुलभ करावी, असेही त्यांनी सांगितले.
सर्व विभागांच्या समन्वयाने अंमलबजावणी
बैठकीला पाणीपुरवठा, जलसंपदा, ग्रामविकास आणि मृद व जलसंधारण विभागांचे अधिकारी उपस्थित होते. सर्व विभागांनी समन्वयाने कालबद्ध नियोजनाची अंमलबजावणी करावी, असे निर्देश देण्यात आले. घटता जलसाठा पाहता या घोषणांची प्रत्यक्ष अंमलबजावणी किती प्रभावीपणे होते, हे महत्त्वाचे ठरणार आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा